आरंभ मराठी / धाराशिव
एका कारमधून गावात आलेल्या दोन जणांनी आपल्याला तुळजापूरच्या दिशेने नेऊन अपहरणाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती कुटुंबीयांना आणि पोलिसांना देणाऱ्या धाराशिव जवळील भातंबरे येथील त्या 14 वर्षीय शाळकरी मुलाने आता हा बनाव असल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. मुलाला क्रिकेटची आवड असल्याने त्याने वडिलांकडे अकॅडमी लावण्याची मागणी केली होती. मात्र वडिलांनी त्यास नकार दिल्याने हा मुलगा घरातून रागाने निघून गेला होता. मात्र तुळजापूरमध्ये गेल्यानंतर त्याचे मत परिवर्तन झाले आणि परत गावी येऊन त्याने आपल्या अपहरणाचा प्रयत्न केल्याची खोटी माहिती कुटुंबीयांना दिली. मात्र पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्याने अपहरण नसून, आपणच घरातून निघून गेलो होतो, असे सांगितले.
धाराशिव शहरापासून जवळच असलेल्या बार्शी तालुक्यातील भातंबरे येथील एका चौदा वर्षीय मुलाचे अपहरण करण्यात आल्याची तक्रार वैराग पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला होता. विशेष म्हणजे हा मुलगा अपहरणकर्त्यांच्या ताब्यातून सुटून सुखरूप घरी परतला होता. त्यामुळे पोलिसांनी दोन्ही बाजूंनी तपास सुरू केला, मात्र सदरील मुलाने कुटुंबीयांना चकवा देण्यासाठी हा बनाव केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.घडले असे की, भातंबरे येथील संतोष माळी यांच्या 14 वर्षीय मुलाला क्रिकेटची आवड असून, त्याला अकॅडमी लावण्याची इच्छा होती. मात्र वडिलांनी त्यासाठी नकार दिला. त्यामुळे त्याने रागाने घरातून निघून जाण्याचा निर्णय घेतला. 10 जुलै रोजी दुपारी तो बसने तुळजापूरला गेला होता. तिथे गेल्यानंतर त्याचे मत परिवर्तन झाले. त्याने तेथून धाराशिव येथील त्याच्या आत्याला फोन केला आणि माझे अपहरण करण्याचा प्रयत्न झाला असून, मी आता त्यांच्या तावडीतून सुटलो आहे, असे सांगितले.त्यानंतर तो धाराशिवला त्याच्या आत्याकडे आला. त्याने त्याच्या वडिलांसह सर्व नातेवाईकांना अशीच स्टोरी सांगितली आणि वैराग पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार देण्यात आली.
गावकऱ्यांनी ही गांभीर्याने याबाबत चौकशी करण्याची मागणी पोलिसांनी या प्रकरणाचा दोन्ही बाजूंनी तपास सुरू केला आणि दोन दिवसात यामध्ये काहीतरी गौडबंगाल असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी सदरील मुलाला विश्वासात घेऊन घडलेल्या प्रकाराबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता अखेर मुलाने सत्य सांगून टाकले. तो म्हणाला माझ्या वडिलांनी मला क्रिकेटची अकॅडमी लावावी म्हणून मी हा बनाव रचला होता. माझे अपहरण वगैरे करण्याचा कोणीही प्रयत्न केला नाही. 14 वर्षीय मुलांनी केलेल्या या बनवेगिरीमुळीमुळे नातेवाईकांसह पोलिसांचीही त्रेधातिरपीट उडाली होती. अखेर मुलानेच सत्य सांगितल्यामुळे पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला. विशेष म्हणजे मुलाने व त्याच्या वडिलांनी वैराग पोलिसांना याबाबत जबाब देऊन ही बनवेगिरी असल्याचे सांगून टाकले. मुलाने रचलेल्या बनवेगिरीमुळे गावात कमालीची भीती निर्माण झाली होती. पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.
जवाबात काय म्हणतोय मुलगा पहा..
मुलाने वैराग पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, मला क्रिकेटची आवड असून मला क्रिकेट अकॅडमी लावायची होती. परंतु वडीलांनी त्यासाठी नकार दिल्याने मी 10/07/2024 रोजी दुपारी 02.30 वा. चे सुमारास घरात कोणास काहीही न सांगता क्रिकेट अकॅडमीत जायचे म्हणून भातंबरे येथुन जामगाव येथे आलो व तेथुन एसटीने तुळजापुर येथे गेलो व तेथे क्रिकेट अकॅडमीचा शोध घेतला परंतु तेथे फी जास्त सांगितल्याने मी परत तुळजापुर रुडॅन्डवर आलो व तेथुन माझी आत्या धाराशिव येथे राहत असल्याने मी आत्याकडे गेलो. त्यावेळी घरातुन गुपचुप निघुन गेल्यामुळे मला माझे वडील व आत्या रागावतील या भितीने वडीलांना व आत्यांना मला पकडून घेवुन गेल्याबाबतची खोटी घटना सांगितली होती. त्याप्रमाणे पोलीसांनाही मी खोटे सांगितले होते. तरी मला कोणाही गाडीत टाकुन घेवुन गेले नसुन तसा काहीएक प्रकार घडला नाही मी माझे वडील रागवतील मारतील या भितीने खोटे सांगितले होते.