मनोज जरांगे पाटील लातूरहून निघाले, धाराशिव शहरात भव्य तयारी,
शहरातील वाहतूक मार्गात बदल, मराठा आरक्षणासाठी जागृती शांतता रॅली
आरंभ मराठी / धाराशिव
मराठा सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी तसेच मराठा आंदोलानादरम्यान राज्यात मराठा बांधवांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत, यासह विविध मागण्यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा महाराष्ट्राभर जनजागृती आणि शांतता रॅली सुरू झाली आहे.आज धाराशिव शहरातून भव्य शांतता रॅली काढण्यात येणार असून, त्यासाठी जय्यत तयारी झाली आहे. मंगळवारी लातूर शहरात रॅली काढल्यानंतर मनोज पाटील यांनी रात्री लातूर जिल्ह्यातील मराठा बांधवांकडून परिस्थितीचा आढावा घेतला. सकाळी ते धाराशिवच्या दिशेने रवाना झाले आहेत. काही तासात धाराशिव शहरातून रॅलीला सुरुवात होईल. त्यासाठी सकाळपासूनच मराठा बांधव ग्रामीण भागातून प्रचंड मोठ्या संख्येने शहरात दाखल होत आहेत.
मराठा आरक्षणाची मागणी मार्गी लावण्यासाठी सरकारला १३ जुलैची दिलेली डेडलाइन सरकारने पाळावी. याकडे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी धाराशिव येथे मराठा योद्धे मनोज जरांगे-पाटील यांच्या उपस्थितीत भव्य मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली काढण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता धाराशिव येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर चौकातून ही रॅली सुरू होणार आहे.
मनोज जरांगे-पाटील यांचे सकाळी ११ वाजता लातूरहून धाराशिवमध्ये आगमन होईल. शांतता रॅलीची सुरुवात अहिल्यादेवी होळकर चौकातुन होईल. यावेळी समस्त धनगर बांधवांच्या वतीने जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक, धारासुर मर्दिनी, हजरत खाजा शमशुद्दीन गाझी दर्गा, विजय चौक, नेहरू चौक काळा मारुती चौक, संत गाडगेबाबा चौक अशी रॅली येईल. या रॅलीत गाडगे महाराज चौकापासून महिला भगिनी देखील सहभागी होऊन, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली आल्यानंतर मनोज जरांगे पाटील शांतता रॅलीला मार्गदर्शन करणार आहेत.
शहरात सर्वत्र स्वागत कमानी, अल्पोपहार पाण्याची सोय
शहरात महत्वाच्या सर्व रस्त्यावर स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. मार्गात विविध जाती धर्माचे बांधव जरांगे पाटील यांचे स्वागत करणार आहेत. विशेष म्हणजे पार्किंग तसेच रॅली मार्गावर पाणी, अल्पोपाहाराचे स्टॉल्स राहणार आहेत. प्रत्येक ठिकाणी मदतीसाठी स्वयंसेवक असणार आहेत.
शहरातील वाहतूक मार्गात बदल –
या रॅलीसाठी मोठ्या संख्येने लोक सहभागी होणार आहेत. त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतुकीत आज सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत बदल करण्यात आले आहेत. शहरात बेंबळी चौकातून येणाऱ्या वाहनांना प्रवेश नसणार आहे. तसेच मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीपासून, आर्य समाज चौकातून तसेच सांजा चौकातून शहरात येणाऱ्या वाहनांना 8 ते 4 दरम्यान प्रवेश बंद असणार आहे.
केलेल्या बदलाप्रमाणे अशी असेल वाहतूक व्यवस्था
1. मध्यवर्ती प्रशासकीय इमारत चौक, धाराशिव ते तुळजापूर / बेंबळी कडे जाणारी वाहतुक शांतीनिकेतन चौक वरुडा रोड ब्रीज मार्गे पुढे तुळजापूर व बेंबळी कडे पथक्रमण करतील.
2. तुळजापूर / बेंबळी ते धाराशिव शहराकडे येणारी वाहतुक फील्टर टाकी तुळजापूर रोडपासुन आयुर्वेदीक महाविद्यालय समोरील हायवे ब्रीज वरुन वरुडा रोड ब्रीज, शांतीनिकेतन चौक मार्गे धारशिव शहरात पथक्रमण करतील.
3. आर्य समाज चौक धाराशिव ते सांजाकडे जाणारी वाहतुक आर्य समाज चौक / जिजाऊ चौक मध्यवर्ती प्रशासकीय इमारत चौक शांतीनिकेतन चौक वरुडा रोड ब्रीज मार्गे पुढे सांजा कडे पथक्रमण करतील.
4. सांजा ते आर्य समाज चौक धाराशिव कडे येणारी वाहतुक एसबीआय बँक चौक सांजा रोड वरुडा रोड ब्रीज शांतीनिकेतन चौक मध्यवर्ती प्रशासकीय इमारत चौक मार्गे पुढे आर्य समाज चौक / जिजाऊ चौक कडे पथक्रमण करतील.
वाहतुकीत केलेले हे बदल पोलीस, रूग्ण सेवा, अग्निशमन दलाची वाहने व अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नाहीत. सर्व नागरिकांनी वाहतुकीत केलेले बदल लक्षात घेऊन त्याप्रमाणे वाहतुकीचे नियम पाळावेत असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले आहे.
अशी आहे धाराशिवमधील पार्किंग व्यवस्था
1)बाजार समिती मैदान
2) हंबीरे पेट्रोल पम्प शेजारील मोकळी प्लॉटिंग
3) सरकारी दूध डेरी
4)बेंबळी रोड,
5) भारत विदयालय नवीन इमारत
6) भारत विद्यालय शाळा रोड,
7) सिद्धाई मंगल कार्यालय
8)अक्षता मंगलकार्यालय
बार्शी रोड
1)मल्टी हायस्कूल
2) लेडीज क्लब
3) श्रीपतराव भोसले हायस्कूल
4)पुष्पक पार्क व परिमल मंगल कार्यालय
सेंट्रल बिल्डिंग शेजारील मशीद पुढे रस्ता बंद
1शेजारील पोलीस निवास मध्ये लावू शकता ऑफिस
तुळजापूर रोड
1)अयोध्या नगर,
2) तंत्रनिकेतन कॉलेज
3) भारत सदनिका
4)ग्रीन लँड स्कूल शेजारी मोकळी जागा
बांधवांनो नियमांचे पालन करा
या रॅली मध्ये लाखोंच्या संख्येने मराठा बांधव तसेच इतर समाजाचे बांधव सहभागी होणार आहेत. रॅलीमध्ये जागोजागी स्वयंसेवक मदतीसाठी तैनात असणार आहेत. रॅलीमध्ये कसलाही गोंधळ न घालता सहभागी व्हावे, रस्त्यावरून चालताना महिला, वृद्ध, बालके यांना जागा करून द्यावी. पोलीस बांधवांना सहकार्य करावे, अम्ब्युलन्ससाठी रस्ता मोकळा करून द्यावा, सर्व बांधवांनी शांततेत ही रॅली पार पाडण्यासाठी सहकार्य करावे,असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.