गजानन तोडकर / कळंब
काही केले तरी कळंब शहरात वीज चोरी थांबण्याचे नाव घेत नाही. या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी धाडी टाकून महावितरणने दीड लाख रुपयांचा दंड वसूल केला. मात्र तरीही वीज चोरी थांबत नसल्याने महावितरण कंपनीने कळंब शहरातील व्यापाऱ्यांचे मीटर थेट रस्त्यावरील खांबावर लावण्याचा निर्णय घेतला आहे. एका बॉक्समध्ये 12 वीज मीटर लावले जात आहेत.
दुकानासह,कार्यालये, घरगुती वीजमीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी करणाऱ्या चार ग्राहकांवर कळंब शहरात नुकतीच कारवाई करण्यात आली. या ग्राहकांनी महावितरणच्या विजेची चोरी करून महावितरणचे लाखो रुपयांचे नुकसान केल्याचे आढळून आले असून, शहरात चार ग्राहकांनी चोरी केल्याचे आढळून आले आहे व त्यांच्याकडून १ लाख ५० हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. याबाबात सांगताना महावितरणचे अभियंता एम. जी. सय्यद म्हणाले की, सद्य परिस्थितीत विजेची मागणी विक्रमी स्तरावर पोहोचली आहे. त्यामुळे सर्वतोपरी प्रयत्न करूनही औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांना विजेची मागणी आणि पुरवठा यातली तफावत कमी करण्यात अडचणी येत आहे. अशातच वीज चोरी करणाऱ्यांचे प्रमाणही वाढले असल्याने प्रशासनाने अशा वीज चोरांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
अनेकदा वीज बिल नियमितपणे भरूनही नागरिकांना खंडित विजेचा त्रास सहन करावा लागतो. यामागे वीजचोरी हे एक ठळक कारण आहे. त्यावर उपाय म्हणून वीज विभागाने कळंब शहरात रस्त्यांच्या बाहेर पोलवर मीटर बॉक्स बसवले आहेत. एका मीटर बॉक्सवर १२ मीटरप्रमाणे १५० मीटर बॉक्स बसवले जाात आहेत. हे काम शहरी भागात चालू आहे.
असे होतील फायदे
हे मीटर बॉक्स कळंब शहरात बसवल्याने ग्राहकांना त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी विजेपासून होणारा धोका टाळता येईल . वीज सस्पार्कमुळे दुकानाचे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे व्यावसायिक हा धोका होणार नाही. यासोबतच मीटरची रिडींग वेळेवर घेतली जाईल व वीज ग्राहकांना वेळेवर बिल मिळेल. मीटरमध्ये छेडछाड करण्याच्या प्रकारास आळा बसेल. त्यामुळे ग्राहकांना वीज अखंडपणे मिळेल.