दुष्काळी सावट विसरून शिराढोण परिसरातील शेतकरी कुंटूंबीयांनी मित्र-कूंटूंबासोबत घेतला वनभोजनाचा आनंद
अमोलसिंह चंदेल / शिराढोण
काळ्या आईचे ऋण व्यक्त करत म्हणजेच शेताची पुजा करून मित्रमंडळीसह वनभोजनाचा आनंद लुटत गुरूवारी वेळा अमावस्या उत्साहात साजरी करून धाराशिव व लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी परंपरा जोपासली. वेळा अमावस्या साजरी करण्यासाठी शेतकरी आणि कुटुंबं शेतात रमल्याने रान – शिवार बहरून गेली होती. त्यामुळे शहरी भागात रस्त्यांवर शुकशुकाट दिसत होता. तर ग्रामीण भागात देखील अघोषित संचारबंदीप्रमाणे चित्र दिसत होते.
पेरणीनंतर येणारी सातवी अमावस्या म्हणजे वेळा अमावस्या. यावर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती जेमतेम आहे. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा आणि काळ्या आईचं ऋण व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे वेळा अमावस्या. यावर्षी अत्यल्प पावसाने दुष्काळाचे सावट असले तरीही शेतकऱ्यांनी वेदना बाजूला सारत वेळा अमावस्या उत्साहात साजरी केली.
उसनवारी करून का होईना पदरी आलेली सर्व दुख: विसरून ही वेळ अमावस्या शिराढोण व परिसरातील बळीराजाने उत्साहात साजरी केली.वेळ अमावस्या प्रत्येक शेतकरी साजरी करत असतो. या दिवशी शेतीत उत्पादन होणाऱ्या सर्व धान्यांची पूजा केली जाते. या दिवशी अमावस्या
साजरी करण्यासाठी सकाळपासूनच लगबग सुरू होती. माठामध्ये ताकापासून तयार झालेली अंबील घेतली जाते तसेच ज्वारी व बाजरी पीठापासून तयार केले उंडे व सर्व भाज्या पासून तयार केलेली मिसळ भाजी याचा नैवैद्य तयार केला जातो. घरातील कर्ता मुख्य व्यक्ती डोक्यावर घोंगडी घेवून व
त्यावर अंबील असलेले माठ ठेवून शेताला फेरी मारतो. त्यानंतर सर्वजण झाडाखााली येवून कडब्यापासून तयार केलेल्या कोपीमध्ये माठाची पुजा करतात.तयार केलेले सर्व पदार्थ भोजनासाठी ठेवून वनभोजनाचा आनंद घेतला जातो. यादिवशी ज्यांना शेती नाही अशांना आवर्जून वनभोजनास बोलावण्यात येते.यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे अर्थात अत्यल्प पावसामुळे दरवर्षीची बहरात आलेली तूर, घाट्यात येवू लागलेला हरभरा, वाऱ्यावर डोलणारे गव्हाचे, ज्वारीचे पीक अभावाने दिसत आहे. पोटात चिंतेची सल असूनही दुष्काळी परिस्थिती विसरत शिराढोण परिसरातील बळीराजाने आपल्याला भरभरून देणाऱ्या शेतीची निसर्गमय वातावरणात पूजा करून या मातीचे आपणही काही देणं लागतो, या पवित्र भावनेने वेळ अमावस्या साजरी केली.
यावर्षी खरीपाच्या उत्पन्नात कमालीची घट झाली आहे. दरवर्षी रब्बी हंगामात ज्वारी, हरभरा, गहू आदी पिकांनी शिवार बहरून जातो. बहरलेल्या रानात मोठ्या उत्साहात काळ्या आईची पूजा केली जाते.परंतू यावर्षी बऱ्याच शेतात रब्बीच्या पेरण्याच झालेल्या नाहीत. त्यामुळे वेळ अमावस्या दुष्काळाच्या सावटत असल्याचे चित्र आहे.
काळ्या आईची कृपा निरंतर राहण्यासाठी साकडं
या काळ्या आईची कृपा आपल्या कूटूंबावर रहावी यासाठी प्रत्येक वर्षी कडब्याची कोप करून लक्ष्मीपुजन करण्याचा मान कूटूंब
प्रमुख किवा नवीन लग्न झालेल्या जोडप्याला दिला जातो. या पुजेसाठी नैवैद्य म्हणून अनेक भाज्यांच्या मिळून मिसळ भाजी, बाजरीची भाकरी, अंबील, गव्हाची खीर, खिचडी, धपाटे अशा पदार्थांचा वनभोजनात समावेश असतो.












