प्रतिनिधी / धाराशिव
धाराशिव जिल्ह्यात ओवीसी समाजाचा लवकरच महा एल्गार मेळावा आयोजित करण्यात येणार आहे.या मेळाव्याच्या निमित्ताने शहरातील परिमल मंगल कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला मान्यवर आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी समाज बांधव म्हणाले की, राज्यात मराठा समाज आरक्षण मागत आहे. त्यांना सरकारने स्वतंत्र आरक्षण द्यावे, त्यास ओबीसी समाजाचा विरोध नसून, ओबीसी समाजाचे असलेले आरक्षण देऊ नये. ओबीसी समाजामध्ये याबाबत जनजागृती करण्यासाठी ओबीसींचा महाएल्गार मेळावा जिल्ह्यात घेण्यात येणार आहे. त्याबाबत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली. शहरातील परिमल मंगल कार्यालयात धनंजय शिंगाडे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मराठा समाजाला सरकारने स्वतंत्र आरक्षण द्यावे, जातनिहाय जनगणना करण्यात यावी, ओबीसी प्रवर्गाच्या आरक्षणाला धक्का लावण्यात येऊ नये, प्रत्येक तालुक्यात ओबीसी समाजाच्या बैठक घेण्यासह इतर विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी पांडुरंग कुंभार, कैलास शिंदे, डॉ स्नेहलता सोनकाटे, रज्जाक अत्तार, दीपक जाधव, बाळासाहेब शिंदे, आबासाहेब खोत, उमाकांत लकडे, अक्षय माने आदींसह इतरांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन लक्ष्मण माने यांनी तर आभार संतोष भोजने यांनी मानले. या बैठकीत धाराशिव, तुळजापूर, उमरगा, लोहारा, वाशी, कळंब, भूम व परंडा या तालुक्यातील ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.