प्रतिनिधी / नळदुर्ग
मनुष्य केवळ आपल्या गुणांनी व कर्मानेच मोठा होतो, उत्तम वस्त्र, सौंदर्य आणि सुदृढ शरीर असूनही त्याच्या अंगी जर उत्तम गुण नसतील तर या सर्व गोष्टी मातीमोल ठरतात, असे मत माजी मंत्री तथा बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मधुकरराव चव्हाण यांनी व्यक्त केले. येथील बालाघाट महाविद्यालयाच्या वतीने शनिवार (दि.२२) रोजी घेण्यात आलेल्या उपजिल्हाधिकारी, कर सहाय्यक, पोलीस खात्यात नोकरी मिळवलेल्या व विविध क्रीडा प्रकारात आजिंक्य पदे पटकाविलेल्या गुणवंताच्या सत्कार कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी प्रमुख पाहुणे तथा सत्कार मुर्ती म्हणून शशिकांत नरवडे, ( भा.प्र.से), कर सहाय्यक अधिकारी अजित लोखंडे, पोउपनिरीक्षक सतीश पवार हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून करण्यात आली .याप्रसंगी प्रमुख सत्कार मूर्ती नवनियुक्त जिल्हाधिकारी शशिकांत नरवडे, कर सहाय्यक अधिकारी अजित लोखंडे व पोलीस उपनिरीक्षक सतीश पवार यांचासह पोलीस शिपाई, सरकारी नोकरी तसेच विविध खेळात राज्य, राष्ट्रीय पातळीवर यश संपादन केलेल्या खेळाडूचा महाविद्यालयाच्या वतीने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना उपजिल्हाधिकारीपदी गवसणी घातलेल्या नरवडे यांनी सांगितले की , ग्रामीण भगातील विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण ग्रामीण भागात झाले आहे म्हणून आपण स्पर्धेच्या युगात टिकू शकणार नाही, हा मनातील नुन्यगंड बाजुला ठेवून अभ्यास केला तर आपल्याला कोणतेही यश पदरात पाडून घेता येते. अभ्यासात सातत्य असेल तर कोणतीही परीक्षा अवघड जात नाही. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ संजय कोरेकर यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार डॉ संतोष पवार यांनी मानले. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ अभय शहापुरकर, संचालक रामचंद्र आलुरे, शहबाज काजी यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास बालाघाट संस्थेचे संचालक प्रकाशराव चौगुले,ऍड. प्रदीप मंटगे उपस्तिथ होते. याप्रसंगी विविध शेत्रात प्राविण्य मिळवलेल्या ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.