कृष्णा मराठवाडा सिंचन योजनेसह मराठवाड्याच्या प्रश्नांसाठी घेतला होता पुढाकार; पाणी वापर प्रमाणपत्रापासून पर्यावरण विभागाच्या परवान्यांसाठी केले प्रयत्न
धाराशिव / परंडा / आरंभ मराठी
मराठवाड्याच्या विकासासाठी विधान परिषदेचे सभागृह गाजविणारे भारतीय जनता पार्टीचे तडफदार माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांना महाराष्ट्र विधान परिषद शतक महोत्सवी कार्यक्रमात राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते विधानपरिषदेतील “उत्कृष्ट भाषण” पुरस्कार देण्यात आला आहे. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प आणि एकूणच मराठवाड्याच्या विकासासाठी त्यांनी विधान परिषदेत जोरदार आणि आक्रमक शैलीत प्रश्न मांडले. त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणांतून मराठवाड्यातील अनेक प्रश्नांची सोडवणूक झाली. वैशिष्टयपूर्ण भाषण शैलीमुळे त्यांना उत्कृष्ठ भाषण पुरस्कार प्रदान करण्यात आला असून, या पुरस्काराबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.
महाराष्ट्र विधान परिषद शतक महोत्सव सोहळा मंगळवारी (३सप्टेंबर) मुंबई येथे विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, विधानपरिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानपरिषद उपसभापती डॅा. नीलमताई गो-हे व विधानसभा उपसभापती नरहरी झिरवळ उपस्थित होते.
या मुद्द्यांवर ठाकूर यांनी उठवला होता आवाज
मा. आ. सुजितसिंह ठाकूर यांना २०१८-१९ साठी महाराष्ट्र विधान परिषद “उत्कृष्ट भाषण” पुरस्कार देण्यात आला असून, विधीमंडळात सुजितसिंह ठाकूर यांनी मराठवाड्याचा अनुशेष, मराठवाडा आणि धाराशिव जिल्ह्यात सततचा पडणारा दुष्काळ, अवर्षण स्थिती, पाणी टंचाई, मराठवाड्याच्या हक्काचे २३.६६ टीएमसी कृष्णा खो-यातील पाणी, शेतकरी कर्ज माफी, शेतकरी आत्महत्या, जलयुक्त शिवार, शेतीपंपाचा वीज प्रश्न, मराठवाड्याचे मागासलेपण, बेरोजगारी आणि राज्यातील इतर विभागाच्या तुलनेत दरडोई कमी असलेले उत्पन्न, उदरनिर्वाहासाठी होणारे स्थलांतर, आकांक्षीत धाराशिव जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या धाराशिव उपकेंद्रास स्वतंत्र विद्यापीठाचा दर्जा द्यावा आदी तसेच राज्यातील जनतेच्या जिव्हाळ्याचे अनेक विषय प्रभावीपणे सभागृहात मांडले होते.
धाराशिव जिल्ह्यातील जनतेला पुरस्कार समर्पित
राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्यावतीने माजी आ. सुजितसिंह ठाकूर यांना “उत्कृष्ट भाषण” हा पुरस्कार मिळाल्याबद्दल ठाकूर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. राज्यभरातील माझ्यावर निखळ प्रेम करणारे सहकारी कार्यकर्ते आणि धाराशिव जिल्ह्यातील जनतेस हा पुरस्कार समर्पित असल्याचे यावेळी सुजितसिंह ठाकूर यांनी सांगितले.