प्रतिनिधी / वाशी
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवनिमित्त माझी माती माझा देश उपक्रम अंतर्गत नगरपंचायतच्या वतीने स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार करून वृक्ष लागवड, कोनशिला अनावरण आणि पंचप्राण शपथ कार्यक्रम घेण्यात आला. सोमवारी (दि.१४) सकाळी आठ वाजता हुतात्मा श्रीधर वर्तक चौक येथे ध्वजवंदन करून हा कार्यक्रम करण्यात आला. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान करण्याचा उपक्रम शासन स्तरावर राबवला जात आहे. त्यानुषंगाने शहरातील श्रीधर कवडे, आनंदराव देशमुख,
खंडेराव चेडे, बाबुराव टेकाळे,बाबुराव साळुंखे, जगन्नाथराव कवडे, आप्पाराव जगताप, शिवाजीराव जगताप, शंकरराव टेकाळे या स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांचा सत्कार नगरपंचायत कार्यालयाच्या वतीने करण्यात आला. यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थी, नागरिकांनी पंचप्राण शपथ घेतली. तसेच येथील बालसंस्कार विद्यालयाच्या प्रांगणात मेरी मिट्टी, मेरा देश उपक्रम अंतर्गत कोनशिलाचे अनावरण करून शहरातील प्रभावती नगर येथे वृक्षरोपण करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष सुरेश कवडे ,गटनेते नागनाथ नाईकवाडी, मुख्याधिकारी गिरीष पंडित, यांच्यासह स्वातंत्र्यसैनिकांचे कुटुंबीय, विद्यार्थी, नागरिक व नगरपंचायतचे कर्मचारी उपस्थित होते.