आरंभ मराठी / धाराशिव
माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यात झंझावाती दौरा आयोजित केला आहे. त्यांनी मराठवाड्यात वेगवेगळ्या तालुक्यात दौऱ्याचे नियोजन केले आहे. ठाकरे यांच्यासोबत एकनिष्ठ राहीलेल्या खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांना अधिक बळ देण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील ठाकरे यांचा हा दौरा महत्वपूर्ण ठरणार आहे.
धाराशिव जिल्ह्यातील सगळ्याच म्हणजे आठही तालुक्यात त्यांचा दौरा निश्चित झाला आहे. शुक्रवार, शनिवार असा दोन दिवसांचा त्यांचा जिल्हा दौरा असून, शुक्रवारी लातूरमार्गे उमरगा, लोहारा, तुळजापूर तालुक्यात दौरा झाल्यानंतर धाराशिव शहरात मुक्काम करून शनिवारी कळंब, परंडा, भूम तसेच वाशी तालुक्यातून ते छञपती संभाजी नगरकडे जाणार आहेत.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील यांनी पक्ष फुटी दरम्यान ठाकरे घराण्यावर आपली निष्ठा दाखवली होती. त्यामुळे मातोश्रीवर या दोन्ही नेत्यांना विशेष स्थान आहे
पक्षाचे प्रचंड नुकसान झाल्यानंतरही खासदार ओमराजे तसेच आमदार कैलास पाटील यांनी ठाकरे कुटुंबाची साथ सोडली नाही. जिल्ह्यातील दोन आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले तरी पक्षाला उभारी देण्यासाठी खासदार तसेच आमदारांनी जिल्हा पिंजून काढला आणि पक्षाची ताकद टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला. पक्षाच्या फुटीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच दौरा असून, या दौऱ्यात ते विरोधकांचा कसा समाचार घेतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
लोकसभेच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या दौऱ्याचे ठाकरे गटाकडून जोरदार नियोजन करण्यात येत आहे. ठाकरे यांच्या जिल्ह्यात एकूण चार ठिकाणी सभा आयोजित करण्यात आल्या असून, उमरगा,तुळजापूर येथे शुक्रवारी तर कळंब आणि भूम येथे शनिवारी सभा होतील.
शुक्रवारी धाराशिव शहरातील सर्किट हाऊस येथे मुक्काम करून शनिवारी सकाळी ते ढोकी मार्गे कळंबला जाणार आहेत. त्यानंतर तेथे सभा घेणार घेऊन येरमाळा मार्गे परंडा येथे जाणार आहेत .परंडा शहरात माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या निवासस्थानी ते भोजन करून तीर्थक्षेत्र सोनारी येथे काळभैरवनाथ यांच्या दर्शनाला जाणार आहेत. त्यानंतर भूम शहरात त्यांची सभा होईल. या सभेनंतर ते सरमकुंडी मार्गे छत्रपती संभाजी नगरकडे जाणार आहेत.या दरम्यान जागोजागी ते लोकांशी संवाद साधतील.
त्यांच्या दोन दिवसांच्या दौऱ्याचे जोरदार नियोजन करण्यात येत आहे.खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर तसेच आमदार कैलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील शिवसेना (उबाठा गट) तयारीला लागली आहे.