जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी घेतला तयारीचा आढावा, मंदिर परिसरात प्रदक्षिणा मार्गावर सावली
सूरज बागल / आरंभ मराठी
तुळजापूर: मंदिराच्या शिखरावर केलेली रंगरंगोटी, मंदिर परिसरात प्रदक्षिणा मार्गावर आकर्षक रंगीत कपड्याने तयार केलेली सावली आणि विद्युत रोषणाई, फुलांची सुरू असलेली सजावट,यामुळे कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचा मंदिर परिसर सुशोभित आणि चैतन्यमय झाला आहे. शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर आणि परिसरात लगबग सुरू आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.भवानी ज्योत नेण्यासाठी गर्दीआई राजा उदो उदोच्या गजराने तुळजाई नगरी दुमदुमून गेली आहे.नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भवानी ज्योत नेण्यासाठी मंगळवारपासून तरुण कार्यकर्त्यांची गर्दी झाली आहे. कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवास गुरूवारपासून (दि.3) आरंभ होत आहे. गुरूवारी पहाटे कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या मुर्तीची सिंहासनावर प्रतिष्ठापना होऊन महाभिषेकानंतर दुपारी घटस्थापनेने नवरात्रोत्सवाची सुरूवात होईल.त्यानंतर तुळजापुरात घरोघरी घटस्थापना होईल. दरम्यान, नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापुरात मंदिर संस्थानने जोरदार तयारी केली असून,मंदिर परिसरात विद्युत रोषणाईने सजावट करण्यात आली आहे.जिल्हाधिकारी डॉ. ओबासे प्रत्येक बाबींचा आढावा घेत आहेत.त्यांच्या कार्यकाळातील हा तिसरा नवरात्रोत्सव आहे.2022 मध्ये त्यांची नवरात्रोत्सवाच्या काही दिवस आधी जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली होती.बाजारपेठेत उत्साह
शारदीय नवरात्र महोत्सवादरम्यान महाराष्ट्र, आंध्र,कर्नाटकासह देशभरातून लाखो भाविक तुळजापूरला येत असतात. त्यामुळे होणारी गर्दी विचारात घेऊन कार पार्किंग येथे 25 हजार क्षमतेचा दर्शन मंडप उभारण्यात आला आहे. नवरात्रोत्वसाच्या पार्श्वभूमीवर भवानीज्योत नेण्यासाठी नवरात्र उत्सव मंडळानी मंगळवारी सायंकाळपासूनच गर्दी केली होती. अनेक गावातून तरूण कार्यकर्ते या उत्सवासाठी तुळजाईनगरीत दाखल होत आहेत. ढोल, ताशा, हलगीच्या गजरात कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. उत्सवाच्या निमित्ताने बाजारपेठ गजबजून गेली आहे. बाजारपेठेत भाविकांना आकर्षित करण्यासाठी दुकानांची आकर्षक मांडणी करण्यात आली आहे. हळदी-कुंकूसह प्रासादिक भांडार, उपहारगृहे भाविकांनी गजबजली आहेत. यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने भाविकांची गर्दी वाढण्याचा अंदाज असून, त्यामुळे यावर्षी मोठ्या प्रमाणात व्यवसाय होईल, असा विश्वास व्यापारी वर्गाला वाटतो.दरम्यान, यासाठी मंदिर प्रशासनाने जोरदार तयार केली असून, शहरात बँरेकेटींग तसेच विविध कामे अंतिम टप्प्यात आहेत.उद्या घटस्थापना, 16 तारखेला कोजागिरी उत्सव
घटस्थापनेनंतर श्री देवीजींच्या वेगवेगळ्या दिवशी महापूजा होतील.त्यात रथ अलंकार महापूजा, मुरली अलंकार महापूजा, शेषशायी अलंकार महापूजा तसेच भवानी तलवार अलंकार महापूजा व महिषासुर मर्दिनी अलंकार महापूजेचा समावेश आहे. महानवमीली म्हणजे 12 ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजता धार्मिक विधी व घटोत्थापन होणार असून, त्यानंतर विजयादशमी (दसरा) सार्वत्रिक सिमोल्लंघण, नगरहून येणाऱ्या पलंग पालखीची मिरवणूक होणार आहे. 13 ऑक्टोबर रोजी पहाटे देवीचे सिमोल्लंघन पार पडणार आहे. त्यानंतर देवीजींची मंचकी निद्रा सुरू होणार आहे. अश्विन शुक्ल बुधवार, 16 ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा असून, गुरुवार, 17 ऑक्टोबर रोजी पहाटे देवीजींची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. सायंकाळी सोलापूरच्या काठ्यासह छबिना होणार असून, महंतांच्या जोगव्याने नवरात्रोत्सवाची सांगता होणार आहे.