सूरज बागल / आरंभ मराठी
तुळजापूर : शारदीय नवरात्रौत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे.तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने महोत्सवाची तयारी सुरू असून, मंदिर संस्थानच्या वतीने प्रसिध्द करण्यात आलेल्या कार्यक्रम पत्रिकेवरून वाद निर्माण झाला आहे. पत्रिकेत तुळजापूर बाहेरील व्यक्तीचे नाव आल्याने पुजारी मंडळासह स्थानिकामध्ये नाराजी निर्माण झाली आहे. यासंदर्भात मंदिर प्रशासनाकडे तक्रार नोंदवण्यात आली आहे.50 वर्षात असा प्रकार घडला नाही, ते आता घडत आहे,असा आरोप पुजाऱ्यानी केला आहे.
श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या कार्यक्रम पत्रिकेत यापूर्वीही अनेकवेळा गडबड झाली होती.त्यातून पत्रिका बदलण्याची नामुष्की संस्थानवर आली होती. यावर्षीही नवीन नाव समाविष्ट केल्याने वाद निर्माण झाला असून, या गोष्टीवर पुजारी मंडळाने आक्षेप नोंदवत मंदिर संस्थानकडे निवेदन दिले आहे. मंदिर संस्थान दरवर्षी नवरात्र उत्सवाची कार्यक्रम पत्रिका तयार करत असते. यावर्षीच्या पत्रिकेत १२ ऑक्टोबरच्या कार्यक्रमात संत जानकोजी भगत हे बाहेरील जिल्ह्यातील नाव समाविष्ट करण्यात आले आहे. मागील 50 वर्षांत पहिल्यांदाच असे नाव समाविष्ट करण्यात आल्यामुळे पुजारी मंडळाने यावर आक्षेप नोंदवत या विरोधात निवेदन दिले आहे.पत्रिकेच्या या वादाचा मुद्दा कशा पद्धतीने संपुष्टात येणार,याकडे लक्ष लागले आहे.
तर आंदोलन करणार
मंदिरात अनेक गोष्टी आजही परंपरेनुसार आहेत.मात्र गेल्या दोन वर्षापासून पुजारी मंडळास विश्वासात न घेता अधिकारी मनमानी कारभार करीत आहेत. यासाठी आम्ही निवेदन दिले असून, यावर तत्काळ निर्णय न घेतल्यास आंदोलन करण्यात येणार आहे.
–विपीन शिंदे,
अध्यक्ष, पुजारी मंडळ, तुळजापूर
–
तहसीलदार मॅडम म्हणाल्या मी रजेवर
याबाबत मंदिर तहसीलदार माने यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, मी गेली आठ दिवसापासून रजेवर असून, उद्या येणार आहे. मंदिराचा चार्ज तहसीलदार अरविंद बोळंगे यांच्याकडे आहे.