प्रतिनिधी / धाराशिव
तुळजापूर येथील कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरातील काही मौल्यवान प्राचीन दागिने गायब झाले असून,या दागिन्यांवर कोणी डल्ला मारला, याचा तपास होण्याची गरज व्यक्त होत आहे. तुळजाभवानी मातेचा खजिन्यातील अलंकार मोजणी नुकतीच पूर्ण झाली असून मोजणी अहवाल नुकताच जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आला आहे. मातेच्या मंदिरात यापूर्वी दानपेटी घोटाळा उघड झाला होता,त्यावर अद्याप कारवाई झालेली नाही.
अलंकार कधी गहाळ झाले याचा खुलासा करण्यात आला नसला तरी मौल्यवान अलंकार गहाळ प्रकरणात आजवरच्या कोणत्याही अधिकाऱ्यांनी कारवाई केली नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून, आता याप्रकरणी जिल्हाधिकारी काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे. तुळजाभवानी मंदिरातील धार्मिक व्यवस्थापकपदाचा पदभार हस्तांतरण अहवाल समितीने मंगळवार (दि. १८) जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ.सचिन ओम्बासे यांच्याकडे सादर केला. अहवालात गहाळ मौल्यवान अलंकार बाबतीत करावयाची कारवाई तसेच सोने चांदी वितळवण्याचा निर्णय विश्वस्तांनी घेण्याचे नमुद करण्यात आले आहे. तसेच धार्मिक विभागाचा महत्वाचा संचिका, नोंदवह्या, दस्ताऐवज, साठा नोंदवह्या आदींचा हंस्तातरणाची माहिती मागणी करून ही समितीला उपलब्ध करून दिली नसल्याचे म्हटले आहे.
अशी आढळली तफावत
तपासणी समितीच्या अहवालानुसार तुळजाभवानी मातेच्या खजिन्यातील डबा क्र. ४, डबा क्र. ५, डबा क्र.६ व डबा क्र.७ मध्ये काही प्राचीन व मौल्यवान अलंकार गहाळ असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तर डबा क्र.१ मध्ये वजनात तफावत आढळून आली आहे. या अहवलानुसार जिल्हाधिकारी कोणती कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे.
दानपेटी घोटाळा, पुढे काय?
कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मंदिरात 8 कोटी 45 लाख 97 हजार रुपयांचा दानपेटी घोटाळा करण्यात आला होता. याप्रकरणी 9 लिलावदार, 5 तहसीलदार आणि अन्य 2 जणांवर भा.दं.वि. संहितेच्या कलम 406, 409, 420, 476, 468, 471, 109, 34 नुसार गुन्हे दाखल करण्याची महत्त्वपूर्ण शिफारस राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने केली होती. संभाजीनगर उच्च न्यायालय आणि विधीमंडळ यांच्या आदेशामुळे ही चौकशी सुरू असताना कारवाई करण्याऐवजी गृह विभागाच्या उपसचिवांनी सदर चौकशी बंद करण्याचा धक्कादायक निर्णय घेतला होता. त्यानंतर मातेची जुनी भांडी गायब झाल्याचे प्रकरण समोर आले होते. आता अलंकार गायब झाले आहेत.