प्रतिनिधी / तुळजापूर
कुलस्वामिनी तुळजाभवानी tuljabhavani मातेच्या मौल्यवान, प्राचीन आणि ऐतिहासिक दागिन्यांवर डल्ला मारल्याचे पुन्हा एकदा शिक्कामोर्तब होत आहे. गेल्या आठवड्यात अलंकार मोजणीच्या अहवालानुसार मातेचे मौल्यवान अलंकार गायब असल्याचे समोर आले होते. त्यानंतर इन कॅमेरा दागिन्यांची फेरमोजणी सुरू असून, त्यातही रेकॉर्डनुसार दागिने उपलब्ध नसल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी सातपैकी डबा क्रमांक चारमधील दागिन्यांची मोजणी झाली, त्यात मातेच्या दागिन्यांमध्ये 12 पैकी 11 अलंकार आढळून आले, मात्र चांदीचा खडाव जोड गायब असल्याचे समोर आले.
तुळजाभवानी मातेच्या या खडाव जोडचे वजन २२।। असल्याची मूळ रेकॉर्डमध्ये नोंद आहे. शुक्रवारी (दि.२८) करण्यात आलेल्या पुनर्मोजणीत डब्यातील एकूण १२ पैकी ११ अलंकार आढळून आले आहेत. शुक्रवारपर्यंत एकूण ७ अलंकार डब्यापैकी ४ डब्यातील अलंकाराची मोजणी पूर्ण करण्यात आली असून,अजून ३ डब्यातील अलंकाराची मोजणी बाकी आहे. दर्शन मंडपातील मोजणी कक्षात शुक्रवारी सकाळी प्रत्यक्ष मोजणीला प्रारंभ करण्यात आला होता. शुक्रवारी केवळ ४ नंबरच्या डब्यातील प्राचीन व मौल्यवान अलंकाराची मोजणी करण्यात आली. मोजणीवेळी उमरग्याचे उपविभागीय अधिकारी गणेश पवार, नायब तहसीलदार अमित भारती, महंत तुकोजी बुवा, महंत चिलोजी बुवा, पुजारी मंडळाचे अध्यक्ष, सोनार, मोडी व उर्दू लिपी जाणकार आदी समिती सदस्यांची उपस्थिती होती.
राजे-महाराजांनी दिलेली भांडीही गायब
कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेवर अनेक राजे,महाराजांची अगाध श्रद्धा होती. छत्रपती शिवाजी महाराज, chhatrapati shivaji maharaj निजामासह अनेक राजे,महाराज,सरदारांनी मातेला अनमोल दागिने, जमिनी,जागा,भांडी आदी साहित्य दान दिले होते. अलीकडच्या काळात देखील मातेला मोठ्या श्रद्धेने दान दिले जात आहे. मात्र दान केलेल्या या अनमोल वस्तू मंदीराच्या खजिन्यातून गायब होत असल्याचे अत्यंत दुर्दैवी प्रकार समोर येत आहेत. मंदिरातील दानपेटी घोटाळ्यानंतर देवीच्या जमिनी लाटल्याचे प्रकार समोर आले. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.प्रवीण गेडाम यांनी हे दोन्ही प्रकार रोखल्यानंतर जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या कार्यकाळात मंदिरातील जुनी भांडी गायब असल्याचा प्रकार समोर आला. ही भांडी ऐतिहासिक होती. याप्रकरणी मंदिराच्या धार्मिक व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता मौल्यवान अलंकार गायब असल्याचे समोर आले आहे. वारंवार घडणाऱ्या अशा प्रकाराने भाविकांतून संताप व्यक्त होत आहे.