वन विभागाला ना बिबट्या सापडला ना वाघ, शेतकऱ्यांमध्ये दहशत कायम
आरंभ मराठी / धाराशिव
गेल्या दीड महिन्यापासून बार्शी आणि धाराशिवच्या सीमेवर वावर असणाऱ्या वाघाने कळंब तालुक्यातील चोराखळी गावामध्ये गुरुवारी (दि.६) पहाटे हल्ला करून एका बैलाला ठार मारले आहे. वन विभागाला वाघ किंवा बिबट्या पकडण्यात अपयश आले असून,जनावरांची शिकार सुरूच असल्याने शेतकरी वर्गामध्ये प्रचंड प्रमाणात दहशत आहे.त्यामुळे वन विभागाचे सर्च ऑपरेशन म्हणजे निव्वळ फार्स ठरला आहे.
बालाजी वसंत गाढवे यांची चोराखळी शिवारात शेती आहे. त्यांच्या शेतातील बैलाची वाघाने शिकार केली. बुधवारी रात्री शेतात बांधलेल्या बैलजोडीतील एका बैलावर गुरुवारी पहाटे वाघाने हल्ला करून बैलाला जीवे मारले.बालाजी गाढवे हे शेतात गेल्यानंतर त्यांना हा प्रकार दिसला.
टीमला अपयश
त्यांनी तात्काळ वनविभागाला या घटनेची माहिती दिली. गेल्या दोन महिन्यांपासून धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव, कळंब, भूम आणि सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात वाघाने दहशत निर्माण केली आहे. या वाघाला पकडण्यासाठी वन विभागाने प्रयत्न केले. परंतु त्यांना ना वाघ सापडला ना बिबट्या.त्यामुळे एक्स्पर्ट टीमचा देखील काहीही फायदा होऊ शकला नाही.पथकाला वारंवार हा वाघ हुलकावणी देत आहे.
जंगलात ट्रॅप कॅमेरे
टिपेश्वर अभयारण्यातून आलेल्या या वाघाने गेल्या दोन महिन्यात चाळीसपेक्षा अधिक छोट्या मोठ्या जनावरांची शिकार केली आहे. मंगळवारी रात्री या वाघाने बार्शी तालुक्यातील भानसाळे येथे दोन पाळीव बैलांवर हल्ला करून ठार मारले होते. त्यानंतर आजही वाघाने बैलाचीच शिकार केली आहे. सुरुवातीला या वाघाने गाईंची शिकार मोठ्या प्रमाणात केली होती. परंतु मागील एक आठवड्यापासून दररोज हा वाघ बैलांवर हल्ला करत सुटल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाच्या पथकाने बालाजी वसंत गाढवे यांच्या शेतात जाऊन पंचनामा केला आहे. वनविभागाने बैलावर हल्ला करणारा वाघ होता की नाही हे ठोसपणे सांगितले नसले तरी या भागातील शेतकऱ्यांना मागील काही दिवसांपासून या परिसरात वाघ दिसत असल्याचे सांगितले आहे. मृत बैलाला वाघ पकडण्यासाठी आलेल्या रेस्क्यू टीमने फॉरेस्टमध्ये टाकले असून, त्या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
ताडोबाची टीम गेली, पुण्याची टीम करतेय प्रयत्न
मागील एकवीस दिवसांपासून वाघाला पकडण्याचे प्रयत्न केले जात असून, वाघ वनविभागाच्या हाती लागत नाही. ताडोबाची रेस्क्यू टीम परत गेली असून पुण्याची टीम वाघाला पकडण्याचे प्रयत्न करत आहे. शिकार केलेल्या बैलाला खाण्यासाठी वाघ पुन्हा त्या परिसरात येऊ शकतो असा अंदाज बांधून वनविभागाच्या रेस्क्यू टीमने वाघाला पकडण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.