प्रतिनिधी / धाराशिव
मराठवाड्यातील सर्वात जुन्या आणि जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेला धाराशिव तालुक्यातील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना यावर्षी सुरू होईल, याचा सगळ्यांनाच आनंद आहे. मात्र या कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचा थकीत वेतन, ग्रॅच्युटीचा विषय कसा सुटणार हा प्रश्नच आहे.कारण 45 कोटींची थकीत देणी मिळावीत,यासाठी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. धाराशिव जिल्हा मध्यवर्ती बँकेने कर्मचाऱ्यांशी करार न केल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांच्या वतीने देण्यात आला.
पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या भैरवनाथ उद्योग समूहाने तेरणा कारखाना भाडेतत्त्वावर घेतला आहे. त्यामुळे कारखाना लवकरच सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र,कारखाना सुरू होण्याची आशा असताना समूहाने बँकेला दिलेले डिपॉझिट आणि भाड्यातून कामगाराचा प्रश्न आधी सुटणे अपेक्षित आहे. तसे झाले नाही. त्यामुळे पालकमंत्री डॉ.सावंत यांनी जिल्ह्याचे पालक या नात्याने कामगारांचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज व्यक्त होत आहे.
डिसीसीविरोधात रोष
मराठवाड्यातील सर्वात मोठा व सर्वात जुना असलेला ढोकी येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना पंचवीस वर्षाकरिता राज्याचे आरोग्य मंत्री ना. तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करणाऱ्या भैरवनाथ शुगर्सला धाराशिव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने देण्यात आला. विविध न्यायालयीन अडथळ्याची शर्यत पार पडत फेब्रुवारी २०२३ मध्ये हा कारखाना भैरवनाथ समूहाकडे सुपूर्द करण्यात आला.मात्र कारखान्याच्या जुन्या व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांशी कसलाही करार बँकेने न केल्यामुळे कारखान्याचे कर्मचारी आक्रमक झाले असून सोमवार, दिं.२५ रोजी कर्मचाऱ्यांनी गेट मीटिंगचे आयोजन केले होते. कारखाना कार्यस्थळावर गेट मीटिंग रद्द करून दत्त टेकडीवरील सभागृहात बैठक संपन्न झाली. यावेळी अफजल काझी, अनंत पडवळ ,जावेद कोहीर, रमेश पाटील, सज्जन धाबेकर, बलभीम कुंभार यांच्यासह कर्मचाऱ्यांनी पुढील लढा ठरविण्यासाठी आपले मत व्यक्त केले. यावेळी जुने व सेवानिवृत्त मिळून दोनशे कर्मचारी उपस्थित होते.
कामगाराचे पंचेचाळीस कोटी रुपये येणे
तेरणा कारखान्यावर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे तब्बल ३१२ कोटी रुपये कर्ज आहे. तसेच तेरणा कारखान्याचे सेवानिवृत्त कर्मचारी, हंगामी कर्मचारी व जुने कर्मचारी यांचे तब्बल ५३ महिन्याचे वेतन थकीत असून त्यासोबतच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युइटी, हंगामी कामगाराचा रिटेनिंग अलाउन्स, ओव्हर टाईम, रजेचा पगार पंधरा व सतरा टक्के वाढीचा फरक तसेच कामगाराच्या पगारातून पतसंस्थेने कपात केलेली रक्कम कारखान्याने पतसंस्थेला दिली नाही असे मिळून सुमारे पंचेचाळीस कोटी रुपये कर्मचाऱ्यांचे येणे कारखान्याकडून आहे. या येण्याबाबत तेरणा कारखाना आवसायक, जिल्हा मध्यवर्ती बँक यांनी कोणताही करार केला नसल्याचा आरोप कर्मचाऱ्यातून होत होता.
जुन्या कर्मचाऱ्यांना कामावर घेण्याची मागणी
सेवानिवृत्त कर्मचारी वगळून जे कर्मचारी जुन्या संचालक मंडळाच्या कार्यकाळात ज्या हुद्द्यावर कारखान्यात कामाला होते त्या कर्मचाऱ्यांना भैरवनाथ समूहाने परत कामावर घ्यावे असा ठराव यावेळी पारित करण्यात आला.
आमचा लढा बँकेबरोबर भैरवनाथ समूहासोबत नाही
यावेळी झालेल्या भाषणात अनेक वक्त्यांनी आमची लढाई भैरवनाथ समुहाशी नसून आमचा लढा हा जिल्हा मध्यवर्ती बँकेची असून त्यांनी आमच्या न्याय हक्काकडे दुर्लक्ष केले असल्यामुळे आम्हाला लढा उभारावा लागत आहे.
बँकेने कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडलेले नाही
भैरवनाथ समूहाशी जिल्हा बँकेचा करार होत असताना बँकेला येणाऱ्या रकमेतून कारखान्याच्या अवसायक पंचवीस टक्के रक्कम मिळणार असून प्राधान्य क्रमाने त्यातील काही रक्कम कर्मचाऱ्यांच्या थकीत देण्यासाठी वापरण्यात येणार आहे.मी स्वतः यासंदर्भात कर्मचाऱ्यांना साखर आयुक्तांना पत्र द्या म्हणून सूचना केली होती. त्यांनी दिलेल्या आदेशाने पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते, असे बँकेचे एमडी विजय घोणसे पाटील यांनी सांगितले.