संत गोरोबा काकांच्या पालखी सोहळ्याचे तेर नगरीमध्ये स्वागत
सुभाष कुलकर्णी / आरंभ मराठी
तेर;वैराग्याचा महामेरु तो गोरा कुंभारू। तोडिले कर आणेसाठी ।।
तेर येथील श्री संत परीक्षक गोरोबा काकांचा पालखी सोहळा रविवारी सायंकाळी तेर नगरीत दाखल झाला असून, तेरणा नदीच्या घाटावर यावर्षीही दीपोत्सव करण्यात साजरा आला.
पालखी सोहळ्याचे भक्तिभावाने स्वागत
हजारो दिव्याने तेरणा घाट दिव्याच्या लखलखाटाने उजळून गेला होता.
तेर येथील वारकरी संप्रदायातील थोर संत परीक्षक गोरोबा काका यांचा पायी पालखी सोहळा प्रतिवर्षी प्रमाणे याही भाऊबीजेला पंढरपूर येथील कार्तिक एकादशीसाठी हजारो वारक-यांसह रवाना झाला होता.कार्तिक सोहळा संपवून १५ नोव्हेंबर रोजी तेरच्या दिशेने मार्गस्थ झालेल्या संत गोरोबा काकांचा पालखी सोहळा येवती, खंडोबाचीवाडी, कुंभेज, कापसेवाडी, काळेगाव, साकत पिंपरी, कौडगाव, सांजा, काजळामार्गे पायी प्रवास करत रविवारी टाळ मृंदगाच्या तालावर हरी नामाचा गजर करीत सायंकाळच्या सुमारास तेर नगरीत दाखल झाला.भाविकांची मोठी गर्दी
सडा, रांगोळी व रोषणाईसह फटाक्यांच्या आतषबाजीने पालखीचे स्वागत करण्यात आले. तेरणा नदीच्या घाटावर ग्रामसेवा संघ,ग्रामस्थ,मंदीर समिती यांच्या दातृत्वातून हजारो दिवे प्रज्वलीत केले गेले. हा दीपोत्सव पाहण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. दिपोत्सवाचे हे चौथे वर्ष आहे. यावर्षी दिपोत्सव पूजेचा मान ह.भ.प. दीपक महाराज खरात, पद्माकर फंड, बालाजी भक्ते, श्रीकांत लाड यांना देण्यात आला. मंदिरात आगमन होताच पालखी सोहळ्याचे मंदिर समितीचे निरीक्षक अतुल नळणीकर, व्यवस्थापक साहेबराव सौदागर यांनी स्वागत केले. यावेळी तेरसह परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.पालखी सोहळ्याच्या आगमनप्रसंगी सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. यावेळी परंपरेने ठरलेल्या ठिकाणी भारुडाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर त्रिविक्रम मंदिरात कीर्तन सेवा संपन्न झाली. गोरोबा काकांच्या राहत्या घरी पालखीची आरती झाल्यानंतर २१ दिवसांपासून सुरू असलेल्या पालखी सोहळ्याची सांगता झाली.