प्रतिनिधी / धाराशिव
धाराशिव तालुक्यातील तुगांव येथे प्रभू श्रीरामाची जन्मभूमी असलेल्या अयोध्येतून आलेल्या अक्षता कलशांची शोभायात्रा मोठ्या उत्साहात काढण्यात आली. अयोध्या येथे उभारण्यात आलेल्या प्रभू श्रीरामचंद्राच्या मंदिरात प्रभु श्रीरामचंद्राच्या मूर्तीची २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा होत असून, त्यासाठी सोहळ्याच्या निमंत्रणासाठी श्रीराम जन्मभूमी ट्रस्टने गावोगाव अक्षता कलश पाठवले आहेत. अक्षता कलशांची मिरवणूक मंगळवारी रुक्मिणी मंदिरापासून सकाळी नऊ वाजता टाळ मृदंगाच्या गजरात, रामनाम- हरिनामाचा जय घोषात काढण्यात आली.अक्षता कलश पालखीमध्ये ठेऊन त्यांची सुंदर सजावट करण्यात आली व शोभायात्रेत भव्य स्थावर प्रभू श्रीरामाची प्रतिमा ठेवण्यात आली होती. त्यासोबतच सजवलेल्या पालखीतही प्रभू श्रीरामाची प्रतिमा ठेवण्यात आली होती. मान्यवरांच्या हस्ते अक्षता कलशांची पूजा करून शोभायात्रेस रुक्मिणी मंदिर चौक येथून प्रारंभ करण्यात आला.
या मिरवणुकीत कलशधारी महिलांसोबतच बाल वारकरी व भजनी मंडळींसह असंख्य श्रीराम भक्तांचा सहभाग होता व लहान मुलांनी केलेली वेशभूषा व वारकरी संप्रदाय आळणी येथील शाळेतील मुले यात्रेची शोभा वाढवत होते. अक्षता मंगल कलश शोभायात्रेत जागोजागी पुरुष व महिला श्रीराम भक्तांनी जागोजागी दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. तसेच फुगडी खेळत फुगडीचा आनंद लुटला. यावेळी गावातील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.