–पुरुषोत्तम आवारे पाटील
आरंभ मराठी विशेष
गेल्या वर्षे-दीड वर्षात मूळ शिवसेनेत बरीच खळबळ झालीय. सत्तांतरानंतर पहिल्या फळीतल्या अनेक निष्ठावानांची तसेच वरिष्ठ नेत्यांची घुसमट सुरूय तर काहीजण या वातावरणात बघ्याची भूमिका पार पाडत आहेत. एकेकाळी शिवसेनेचा आवाज असलेले आणि बाळासाहेबांच्या निकटचे मानले जाणारे पक्षाचे ज्येष्ठ नेते,माजी मंत्री दिवाकर रावते यांचं नाव सध्या कुठेच दिसत नाही. त्यांचं नेमकं काय चाललंय, असा प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे. या पार्श्वभूमीवर अकोला येथील ज्येष्ठ पत्रकार पुरुषोत्तम आवारे-पाटील यांनी त्यांची मुंबईतील निवासस्थानी भेट घेऊन अनौपचारिक संवाद साधला. या भेटीनंतर आवारे-पाटील यांनी मांडलेला अनुभव.
शिवसेनेत प्रबोधनकार ते आदित्य या चार पिढ्यांसोबत काम करणाऱ्या बोटांवर मोजता येणाऱ्या नेत्यांमध्ये दिवाकर रावते यांचे नाव घेतले जाते. कडक शिस्त,कमालीचा वक्तशीरपणा, संसदीय लोकशाहीचा सखोल अभ्यास आणि थेट अंगावर जाण्याचा स्वभाव यामुळे दिवाकर रावते यांच्या पासून सामान्य शिवसैनिकच नव्हे तर अनेक पदाधिकारी टरकून वागतात,त्यांची आदरयुक्त भीती आजही लोक बाळगून असतात. साधारणपणे 1996 पासून माझा यांचेशी परिचय आहे,2004 साली मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर म्हणून रुजू झाल्यावर हा परिचय अधिक वाढला.अनेकदा काही काम नसले आणि रावते मनोरा नजीकच्या शिवालय मध्ये असले की हमखास त्यांच्या केबिनला जाऊन बसणे आणि विविध विषयांवर गप्पा मारणे हा योग मला घडला.
ते पश्चिम विदर्भाचे सेना संपर्कप्रमुख असताना अकोल्यात आले की अकोला सेना पदाधिकारी दहशतीखाली असत,कारण त्यांची शिस्त आणि दिलेल्या कार्यक्रमाचा बारीक आढावा हे असे,त्यांना टाइमपास करणारे पदाधिकारी अजिबात आवडत नसत,त्यामुळे ते आले की सगळ्यांची झाडाझडती ठरलेली असे,विश्राम गृहाचे वातावरण तणावात असे अश्यावेळी त्यांच्याशी कोणत्याही विषयावर विनोद करून वातावरण हलके करणारे सुधाकर खुमकर आणि मी असे दोनच लोक होतो,त्यामुळे रावते अकोल्यात आले की काही पदाधिकारी आमची हमखास आठवण काढीत असत.
1991-92 या सालात दिवाकर रावते मुंबईचे महापौर झाले तेव्हा पासून ते सतत कुठल्यातरी सत्तेत आहेत,अगदी अलीकडे फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात ते परिवहन मंत्री असे पर्यंत सत्तेत होते.2019 ला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांचा परिषदेतील कार्यकाळ संपल्यावर पुन्हा संधी मिळाली नाही पण संघटनेत त्यांच्यावर जबाबदारी कायम ठेवण्यात आली,ते आजही पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख पदावर कायम आहेत.
मुंबईचे महापौर पद ज्यांना लाभते ते नंतर मुंबईत असे गुंतून जातात की कुणी त्यांना सोन्याने तोलले तरी ते मुंबई सोडत नाहीत. दिवाकर रावते मात्र याला तडा देणारे अजब रसायन आहेत,शब्द,समर्पण आणि निष्ठा याला आपल्या जगण्यात मोठे महत्व देणारे रावते बाळासाहेब ठाकरे यांच्या एका आदेशावर मुंबईचे वैभव सोडून मराठवाडा सारख्या निबिड अरण्यात आपली धोपटी घेऊन दाखल झाले. दहा बारा वर्षे मराठवाड्यात गावोगाव फिरले,रस्त्यावरची माणसे हेरून त्यांना संघटनेत अन पुढे सभापती, आमदार,खासदार अश्या पदांवर संधी दिली अन मराठवाडा सेनेचा बालेकिल्ला करूनच मुंबईत परतले.
2019 पासून मंत्रालय किंवा विधिमंडळ परिसरात रावते दिसत नव्हते,त्यामुळे त्यांच्या विषयी सेनेत अन बाहेरही कुजबुज सुरू असते,अशावेळी रावते साहेब सध्या काय करतात ?असा प्रश्न अनेकदा येत होता मात्र योग जुळून येत नव्हता. अशावेळी ऍड.अनिल काळे हा हक्काचा माणूस कामात येतो.अनेकदा आमदार होता होता वाचलेला हा माणूस मुंबईत अकोलेकर मित्रांचा “सखा “बनतो.दिवाकर रावते आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यात जे होते तेच संबंध आजच्या काळात रावते आणि काळे यांच्यात आहेत. त्यामुळे ऍड.काळे यांना बौद्धिक खाज सुटली की ते दादर गाठतात,परवा सुद्धा तसेच झाले,ते रावते साहेबांना भेटायला निघाले असताना सुधाकर खुमकरला त्यांचा निरोप आला ,मी अचानक त्यात सामील झालो अन रावते साहेबांची बऱ्याच वर्षानंतर भेट झाली.
दादरला वर फ्लॅट अन खाली कार्यालय ,कार्यलयापुढे खुर्ची टाकून रावते बसलेले , मला नि सुधाकरला बघताच,ते ऍड.काळे याना म्हणाले ” हे दोघे कुठे सापडले तुम्हाला ? हाच धागा होता,गप्पा प्रारंभ करायला,पुढे दिडतास ,विविध क्षेत्रात गप्पा शिरत राहिल्या,मध्येच अनिल गावंडे सामील झाले, अकोट मतदार संघाचा विषय निघून गप्पा पुन्हा असंख्य विषयात हेलकावे घेऊ लागल्या, रावते सध्या आयुष्याच्या 76 व्या वळणावर आहेत चेहरा थोडा निस्तेज झालाय पण स्मरण,बुद्धी,जिज्ञासा अन राजकीय,सामाजिक भान सतेज दिसले.
आता त्यांची दिनचर्या काय असावी ? याची मला उत्सुकता आहेच,चर्चेत तो विषयही काढला पण त्याचे उत्तर त्यांनी टाळले,रावते यांचे हेही एक वैशिष्ट्य आहे,ज्याचे उत्तर त्यांना द्यायचे नसते तो प्रश्न ते असा टाळतात की समोरच्याला त्याची जाणीव होऊ देत नाहीत. परत येताना मी सुधाकरला म्हणालो” ज्याने सेनेत प्रबोधनकार ते आदित्य अश्या चार पिढ्यांसोबत काम केले,मोठी संसदीय कारकीर्द गाजवली,मराठवाडा उभा केला त्या माणसाचे अजूनही चरित्र का आले नाही ? किमान परिषदेतील गाजलेली भाषणे पुस्तक रुपात यायला हवी होती ते का झाले नाही ? उत्तर कदाचित रावते यांच्या स्वभावात असेल ,किंवा त्यांचे एकलव्य ऍड.अनिल काळे देऊ शकतील,मात्र हा संघर्ष,त्याग,निष्ठा, समर्पण लोकांपुढे यायला हवी असे वाटते.
-संपर्क 9892162248