अमोलसिंह चंदेल । शिराढोण
व्यवसायाला शहर किंवा ग्रामीण भागाची मर्यादा नसते. गुणवत्ता, योग्य मार्केटिंग आणि परिश्रमासोबत जिद्द, चिकाटी असेल तर कोणत्याही उत्पादनाला उठाव मिळू शकतो, हे दाखवून दिलेय ताडगावच्या जाधवर कुटुंबातील उद्योजकांनी. त्यांनी उत्पादित केलेला मसाला धाराशिव जिल्ह्यातच नव्हे तर नांदेड, बीड, लातूर जिल्ह्यातील खेड्यापाड्यात पोहोचतोय.त्यांनी मसाला उद्योगातून साधलेली समृद्धी आदर्शवत आहे.
कळंब तालुक्यातील केवळ 2 हजार लोकसंख्या असलेल्या गावात येथील रहिवाशी असलेले हरिश्चंद्र भारत जाधवर व रामचंद्र जाधवर या बंधूनी मिळून आपल्या शेतात मसाले उद्योग उभा केला आहे. या उद्योगातून त्यांना महिन्याला समाधानकारक उत्पन्न मिळत आहे.
सततचा दुष्काळ तसेच ग्रामीण भागातील शेती व्यावसायावर येणारे संकट पाहता या सुशिक्षीत असलेल्या शेतकरी कूटूंबातील तरुणांना काहीतरी उद्योग उभा करावा असे सातत्याने वाटत होते. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या उद्योग व्यवसायांना भेटीही ते देत होते. या क्षेत्रातील अभ्यास करुन शेवटी त्यांनी आपल्या शेतात मसाले उद्योग उभारण्याचा निर्णय घेतला. उद्योग उभारण्यासाठी गुंतवणूकही मोठी होती. शेती उत्पन्नाच्या माध्यमातून तसेच कर्जाऊ रक्कम जुळावाजुळव करत या युवकांनी 12 ते 15 लाख रुपये गुंतवणूक करुन मसाला प्रक्रीया तसेच पॅकींगसाठी असणा-या मशनरी खरेदी
केल्या. एवढी मोठी गुंतवणूक करुन त्यांच्या समोर हा उद्योग सुरु करण्यापासून ते तयार केलेल्या मालाची विक्री करण्याचे समोर आव्हान होते. जिद्द, चिकाटी आणी मेहनतीच्या जोरावर जाधवर बंधूंनी या उद्योगास सुरुवात केली. सोहमबंधू मसाले उद्योग नावाने हा व्यावसाय सुरू झाला. त्यांनी तयार केलेली मसालेही धाराशिवसह लातूर, बीड, नांदेड आदी जिल्ह्यात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. पदवीधर असलेल्या या जाधवर बंधूंनी हा उद्योग सुरु करुन परिसरात असलेल्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांसमोर आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या उद्योगातून ते सर्व प्रकारची दर्जेदार मसाले तसेच मिरची पावडर, हळद आदी तयार करतात. त्यांना आज या उद्योगातून 25 ते 30 हजार रुपये महिना उत्पन्न मिळत आहे. त्यांच्या जिद्दीने,चिकाटीने त्यांना या व्यवसायाने आत्मसन्मान दिला आहे.