ग्रामदिंडीच्या माध्यमातून अक्षता वाटून समस्त शिराढोणकरांना अयोध्येचे निमंत्रण
अमोलसिंह चंदेल / शिराढोण
२२ जानेवारी २०२४ रोजी पावनभूमी अयोध्या नगरीमध्ये प्रभु श्री रामलल्लांची भव्य दिव्य मंदिरात प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यानिमित्ताने अयोध्या येथून आलेल्या मंगल अक्षतांची शोभाकलश यात्रा व ग्रामदिंडी शिराढोण (ता. कळंब) आयोजित करण्यात आली होती. या शोभायात्रेत गावातील श्री रामभक्तांनी सहभागी होऊन मनोभावे पूजन केले. गावातील प्रत्येक घरासमोर रांगोळी काढण्यात आली होती. अतिशय मंगलमय वातावरणात जय श्रीरामच्या नामघोषत कलशयात्रा काढून मनोभावे ठिकठिकाणी महिलांनी पूजन केले.
गावातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून ही कलशयात्रा व ग्रामदिंडीची सुरूवात झाली. पुढे खंडोबा मंदिर,गणपती मंदिर,दत्त मंदिर,जागृत हनुमान मंदिर, छत्रपती संभाजी राजे चौकातील हनुमान मंदिर, सेंट्रल हनुमान मंदिर, जैन मंदिर,बालाजी मंदिर, शिराढोणचे ग्रामदैवत ढोणेश्वर मंदिर, नागनाथ महाराज मठ व जय भवानी मंदिरमार्गे विठ्ठल रुक्माई मंदिरात महाप्रसाद घेऊन ग्रामदिंडीचा समारोप करण्यात आला. यावेळी प्रत्येक कुटूंबास आयोद्धेतील अक्षता व श्री राम मंदिराची प्रतिमा देण्यात आली.
महिलांचा लक्षणीय सहभाग
गावातून शोभायात्रा निघणार असल्याने गावातील व्यापारीही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शोभायात्रेला गावातील रस्त्याच्या दोन्ही बाजूनी रांगोळी काढून, श्रीरामाच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करण्यात आली. अयोध्या येथून आलेल्या प्रभू श्रीरामचंद्राच्या मंदिर निर्माण अक्षता व कलशाच्या स्वागतासाठी गावातील महिला, बालक व नागरिक मोठ्या संख्येने या कलशयात्रेत सहभागी झाले होते.