प्रतिनिधी / धाराशिव
महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासन कटिबद्ध असून, विविध माध्यमातून महिलांना रोजगार आणि स्वावलंबी होण्याच्या संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी धाराशिव येथे हिरकणी महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात केले. मुंबई – पुण्याच्या धर्तीवर धाराशिव शहरात महिलांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी अर्चनाताई पाटील यांचे कौतुक केले.
यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष अर्चना पाटील,जिल्हा महिला व बालविकास अधिकारी एस.व्ही.अंकुश यांची प्रमुख उपस्थिती होती. तटकरे म्हणाल्या, राज्यातील मिनी अंगणवाड्यांचे रूपांतर हे आता अंगणवाडीमध्ये करण्यात आले आहे. जवळपास हा आकडा 13 हजारापेक्षा अधिक आहे.यामुळे मिनी अंगणवाडीच्या सेविका ह्या अंगणवाडी सेविका म्हणून त्यांची पदोन्नती झाली आहे.प्रत्येक अंगणवाडीला नव्याने मदतनीस म्हणून असलेल्या पदांना सुद्धा मंजुरी देण्यात आली आहे.अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्या मार्गी लावण्याचे काम वेगाने सुरू आहे. महिला व बाल विकास विभाग बचत गटांना सर्वतोपरी मदत करण्यात अग्रेसर राहणार असल्याची ग्वाही देताना बचत गटांच्या नाविण्यपूर्ण प्रकल्पांसाठी जिल्हा नियोजन निधीतून मदत करण्याचे,बचत गटांकडून शाळांसाठी गणवेश शिवून घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. बचतगटांना आपली उत्पादने विक्रीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष अर्चनाताई पाटील यांचे अभिनंदन केले. यावेळी त्यांनी महिला बचतगटांसाठी शासनातर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. तटकरे आपल्या मार्गदर्शनात पुढे म्हणाल्या,मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण योजनेंतर्गत केंद्र व राज्याच्या असणाऱ्या महिला धन योजना एका छताखाली आणून जास्तीत जास्त महिलांचे प्रस्ताव कार्यान्वित करण्याचा प्रयत्न असणार त्या म्हणाल्या.
धाराशिव शहरात आयोजित हिरकणी महोत्सवात 160 पेक्षा अधिक स्टॉल्स लावण्यात आले आहे. हा उपक्रम नक्कीच महिला उद्योजकांना रोजगार उपलब्ध करून देणारा तर आहेच त्याचबरोबर महिलांना एक चांगला व्यासपीठही उपलब्ध करून देत आहे.या महोत्सवाच्या आयोजनाबाबत श्रीमती तटकरे म्हणाल्या,मुंबई,पुणे,नवी मुंबई अशा मोठ्या शहरांमध्ये अशा प्रकारचे महोत्सव आयोजित करण्यात येतात. धाराशिवमध्येही गेल्या सहा वर्षांपासून आयोजित होणाऱ्या या हिरकणी महोत्सवाबाबत त्यांनी महिला बचत गटांची व आयोजकांचे कौतुक केले.
राज्य शासनाकडून महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत देण्यात आल्याने राज्यातील महिला अत्यंत आनंदी आहेत.राज्यभरातून आलेल्या महिला बचत गटांकडून वेगवेगळ्या उत्पादनांच्या स्टॉल्सला अदिती तटकरेंनी भेट दिली व महिला उद्योजकांची संवाद साधला.
महिला सबलीकरणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभारही मानले.या कार्यक्रमास जिल्ह्यातील महिला उद्योजक, अंगणवाडी सेविका,आशा वर्कर आणि महिला बचत गटातील महिला सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.