शेतकऱ्याचे दुष्काळात प्रयत्न, ७० हजार रुपये खर्च करून जलपुनर्भरण
अमोलसिंह चंदेल / आरंभ मराठी
शिराढोण; दुष्काळी झळा असह्य होत आहेत. सातत्याने पडणारा दुष्काळ आणि त्यातून शेतक-यांची बिघडलेली आर्थिक गणिते, यामुळे जिल्हयातील शेतकरी नैराश्याच्या गर्तेत आहे. जिल्ह्यात सर्वत्र यावर्षी भीषण दुष्काळाला तोंड द्यावे लागत आहे. थेंब थेंब पाण्याचे महत्व आता लोकांना कळत आहे. जिथे माणसाला प्यायला पाणी नाही तिथे शेती कशी करायची, या विवंचनेत शेतकरी आहेत. विहिरी, तलाव, बोअर सगळे पाण्याचे साठे कोरडे पडत आहेत. भूजलपातळी दिवसेंदिवस खाली जात आहे. याच पाण्याचे महत्व समजलेल्या शिराढोण येथील शेतकरी गोपीनाथ विश्वनाथ राउत यांनी आता ज्या दुष्काळाला तोंड देत आहोत, तशी वेळ पुन्हा येऊ नये यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. ५८ वर्षीय गोपीनाथ राऊत यांनी या दुष्काळी परिस्थितीत खचून न जाता येणारा काळ तरी किमान सुखाचा जावा या उद्देशाने प्रेरीत होवून.शेतात पाणी जिरवण्याचे काम हाती घेतले आहे. त्यांनी त्यांच्या दगड गोटे असणाऱ्या माळरानावर कोणतेही जलस्त्रोत उपलब्ध नसताना स्वखर्चातून पाणी आडवा, पाणी जिरवा उपक्रम राबविला आहे. यासाठी त्यांनी ७० हजार रुपये खर्च करून शेतात विविध ठिकाणी चारी खोदकाम करुन त्यात शेतातील दगड गोटे भरले आहेत. भीषण दुष्काळी परिस्थितीत खचून न जाता दुष्काळाची दाहकता येणाऱ्या काळात कशी कमी करता येईल हा ध्यास मनी बाळगून, गोपीनाथ राऊत यांनी आपल्या परिस्थितीनुसार स्वतः परिश्रम व आर्थिक खर्च करण्यासाठी ऑक्टोबरपासूनच नियोजन सुरु केले होते.गोपीनाथ राउत यांना साडे तीन एकर कोरडवाहू जमीन आहे. त्यात त्यांच्या शेतात विहीर किंवा कूपनलीका असे कोणत्याही प्रकारचे जलस्त्रोत उपलब्ध नाही. तरीही त्यांनी त्यांच्या शेतात ७० चौ.फूट लांबी, ६ चौ.फुट रुंदी व ५ फुट खोल अशा एकूण ४ चाऱ्या यंत्राव्दारे खोदल्या आहेत. त्यांनी ऑक्टोबर महिन्यापासूनच त्यांच्या या माळरानावरील दगड गोटे वेचण्याचे काम स्वतः सुरु केले होते. सहा महिने त्यांनी एकट्यानेच दिवसभर शेतातील दगड वेचून ते दगड खोदलेल्या चारीमध्ये टाकण्याचे काम केले. ऑक्टोबर महिन्यापासून अतिशय नियोजनबद्ध त्यांनी कामाचे नियोजन केले होते. आजपर्यंत एकटयानेच परिश्रम करुन खोदलेल्या चारी त्यांनी दगड गोट्यानी भरुन टाकल्या. दोन महिन्यानंतर पावसाळयात शेतात पावसाव्दारे पडलेले पाणी या खेदलेल्या चारीमध्ये येवून ते जमीनीत मुरणार आहे. पाणी जमिनीत मुरल्यास जमिनीतील पाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहे. आपल्या शेतात विहीर अथवा कूपनलीका नसतानाही राउत यांनी जलपुनर्भरणासाठी केलेले हे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. जमिनीत मुरलेल्या पाण्याचा उपयोग आपल्याला नाही, परंतु दुसऱ्या शेतकऱ्याला त्याचा नक्कीच उपयोग होईल अशा निस्वार्थी भावनेतून त्यांनी हे काम केले आहे. गोपीनाथ राऊत यांनी दाखवलेली ही जलसाक्षरता अनेकांना प्रेरणा देणारी आहे.
विकत पाणी आणून ४० वृक्षांचे संगोपन
गोपीनाथ राउत हे शेतकरी परीसरात वृक्षप्रेमी म्हणून ओळखले जातात. कोरडवाहू असलेल्या शेतातील मिळालेल्या उत्पन्नातून केलेला खर्चही निघत नाही. परंतू ते १२ महिने दररोज शेतात जातात. त्यांनी त्यांच्या शेतात आंबा, जांभ, शेवगा, लिंबू, चिकू आदी प्रकारच्या ४० वृक्षांचे संगोपन केले आहे. पाण्याचा स्त्रोत नसल्याने त्यांना उन्हाळयात या झाडांना विकत पाणी घेऊन जिवंत ठेवावे लागते.
गॅस शेगडी दूरुस्तीचा व्यवसाय:शिराढोण येथील शेतकरी गोपीनाथ राउत यांना शेतातून पाऊसकाळ चांगला झाला तर थोडे फार उत्पन्न हाती लागते. निव्वळ शेतीवर अवलंबून राहता येत नसल्यामुळे त्यांनी त्यांची उपजिवीका भागविण्यासाठी गॅस शेगडी दूरुस्तीचा व्यावसाय सुरु केला आहे. शेगडी दुरुस्ती तसेच सुरक्षित गॅस कसा वापरावा, याची माहिती ते लोकांना देतात. ते गावातील प्रत्येक कूटूंबाच्या घरी जाऊन सेवा देतात व मार्गदर्शन करतात.