आज गणिते ठरणार, भाजपमधून राष्ट्रवादीत कोणाचा प्रवेश होणार, जिल्ह्याचे लक्ष
आरंभ मराठी / धाराशिव
उस्मानाबाद लोकसभेच्या निवडणुकीत ऐनवेळी अनपेक्षित बदल होण्याची शक्यता असून, भाजपमधून एका व्यक्तीचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होऊन राष्ट्रवादीकडून उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे.मात्र या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.
आज सायंकाळपर्यंत पक्ष प्रवेशासह उमेदवारीचा निर्णय घेतला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, या नव्या चेहऱ्यामुळे खासदार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यासाठी ही लढत सोपी होणार की अवघड, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.मात्र बदलत असलेल्या नव्या समीकरणांमुळे राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.
उस्मानाबाद लोकसभेची निवडणूक काही दिवसांवर आली आहे. महाविकास आघाडीविरूध्द महायुती असा थेट सामना होण्याची शक्यता आहे.
लोकसभेच्या आखाड्यात महाविकास आघाडीकडून खासदार ओमराजे निंबाळकर यांचे नाव जाहीर झाले असले तरी महायुतीकडून अद्याप पैलवान कोण याबद्दल प्रश्नचिन्ह कायम आहे. याबाबतची उत्सुकता वाढली असतानाच दररोज नवनवीन नावांवर चर्चा सुरू आहे. कधी राष्ट्रवादी काँग्रेसला ही जागा सुटल्याची तर कधी शिवसेनाच उस्मानाबादची जागा लढवणार असल्याची चर्चा सुरू आहे.
इकडे भाजपने उस्मानाबादची जागा कोणत्याही परिस्थितीत आपल्याच पक्षाला मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तिन्ही पक्षाचे नेते 15 ते 20 दिवसांपासून मुंबईत ठाण मांडून बसले आहेत. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटल्याचे जवळपास निश्चित आहे.
पण ऐनवेळी भाजपकडून नवा डाव टाकला जाऊ शकतो. किंवा नव्या माहितीनुसार भाजपमधील एक व्यक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून त्या व्यक्तीला उमेदवारी दिली जाऊ शकते.
याबाबतचा निर्णय आजच होईल असे सांगितले जात असून, कदाचित सायंकाळपर्यंत पक्ष प्रवेश आणि उमेदवारी दोन्ही जाहीर होऊ शकते. या सगळ्या घडामोडींकडे अर्थातच लोकसभा मतदारसंघातील मतदारांचे लक्ष लागले आहे.
मात्र,समीकरणे बदलून नवा राजकीय डाव टाकला गेला तर विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासाठी ही लढत वाटते तेवढी सोपी असेल की अवघड हे सांगणे कठीण आहे. येणाऱ्या काही दिवसात याबाबतचे चित्र स्पष्ट होईल.त्यामुळे या राजकीय घडामोडींकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.