प्रतिनिधी / लोहारा
लोहारा तालुका निर्मितीनंतर अनेक शासकीय कार्यालय कार्यान्वित झाले. परंतु आजही लोहारा तहसील कार्यालयामध्ये अनेक पदे रिक्त असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे तहसील कार्यालयातील रिक्त पदे तत्काळ भरण्यात यावीत, अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा ईशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
धाराशिव येथे जिल्हाधिकारी यांना सोमवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लोहारा हा ग्रामीण भागातील मागासलेला तालुका आहे. या तालुक्यामध्ये शेतकरी वर्गांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. शासनाच्या अनेक योजना, प्रकल्प मोहीम राबविल्या जातात. महसूल विभागांमध्ये अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे व अनेक पदे रिक्त असल्यामुळे कामानिमित्त आलेल्या नागरिकांची, शालेय विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. अव्वल कारकुनाकडे मुळ पदासह नायब तहसीलदारांचाही अतिरिक्त पदभार देवुन कामकाज चालविण्यात येत आहे. महसुल सहाय्यकाकडे दोन-तीन अतिरिक्त विभागाचा पदभार असल्यामुळे सुट्टी दिवशी देखील कार्यालयात बसून कर्मचाऱ्यांना प्रलंबित कामे व शासनाला उपयोगी असणारी माहिती द्यावी लागते.नागरिकांना छोट्या मोठ्या कामासाठी अनेकदा तहसील कार्यालयाच्या दैनंदिन चकरा मारत उंबरठे झिजवावे लागत आहे.त्यामुळे तात्काळ रिक्त पदे भरण्यात यावे अन्यथा लोकशाही पद्धतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा या निवेदनात दिला आहे. रिक्त पदे तात्काळ भरण्यात न आल्यास ३० जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल, याची शासनाने तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा होणाऱ्या परिणामास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील, असे या निवेदनात म्हटले आहे.
निवासी उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांना हे निवेदन देण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे धाराशिव जिल्हाध्यक्ष शरद पडवळ, लोहारा तालुका प्रमुख बालाजी यादव उपस्थित होते.