प्रतिनिधी / धाराशिव
धाराशिव रोटरी क्लबच्या माध्यमातून आणखी एक नवा इतिहास रचला जाणार आहे.रोटरीच्या पुढाकाराने परिवारातील 17 सदस्य धाराशिव ते कन्याकुमारी अशा तब्बल 1400 किलोमीटर अंतराच्या सायकल प्रवासाला निघाले आहेत.या तरुणांनी आज पहाटे 4 वाजता कन्याकुमारीकडे प्रस्थान केले. त्यांचा हा प्रवास अत्यंत धाडसी आहे. त्यांच्या या प्रवासाला शुभेच्छा देण्यासाठी शहरातील रोटरीचे पदाधिकारी, सदस्य तसेच नागरिक उपस्थित होते.
धाराशिव ते कन्याकुमारी मोहिमेत सहभागी झालेले हे तरुण रोटरी सदस्य असून, ते शहरात वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमात आणि हाफ मॅरेथॉन, सायकल मोहिमेत पुढाकार घेत असतात. त्यांनी मोठ्या धाडसाने1400 किलोमीटर सायकल प्रवासाची मोहीम हाती घेतली असून,यातून धारशिकरांच्या नावे नवा विक्रम नोंदला जाईल. तसेच सायकल वापराचा संदेश देतानाच नवा आदर्श घालून देण्याचा प्रयत्न असेल.
यापूर्वी शहरातील काही तरुणांनी धाराशिव ते किल्ले रायगड अशी मोहीम यशस्वी केली होती. शहरातील सायकल ग्रुपचे सदस्य नियमितपणे 150 ते 200 किलोमीटर सायकलिंग करतात.त्यातून सायकल वापराचे महत्व सांगण्याचा प्रयत्न असतो. कन्याकुमारीपर्यंतच्या या सर्वात मोठ्या मोहिमेत दररोज 150 ते 200 किलोमीटर सायकल प्रवास केला जाणार आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे तरुणांनी हाती घेतलेली मोहीम नक्कीच वाखाणण्याजोगी आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून हिरवी झेंडी दाखवून या मोहिमेची सुरुवात झाली.यावेळी टाळ्यांच्या गजरात शहरवासीयांनी तरुणांना शुभेच्छा दिल्या.