आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची ग्वाही
प्रतिनिधी / धाराशिव
जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाने प्रचंड ओढ दिल्याने सोयाबीन पिकाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट दिसून येत आहे. खरिपातील मुख्य नगदी पिकचं अडचणीत येत असल्यामुळे शेतकरी अत्यंत चिंताग्रस्त असून बळीराजाला दिलासा देण्यासाठी महिनाभरात अग्रीम विम्यापोटी किमान ५ हजार रुपये प्रतीहेक्टरी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
आमदार राणा पाटील यांनी म्हटले आहे की,पावसाने ओढ दिल्याने उत्पादनामध्ये प्रचंड घट होतेय हे गृहीत धरून प्रधानमंत्री पिक विमा योजनेतील निकषाच्या पुढे जाऊन या परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करणे अनिवार्य आहे. त्यामुळे महिनाभरात सर्व प्रक्रिया पूर्ण करून शेतकऱ्यांना २५ % अग्रिम मिळवून देण्यासाठी प्रयत्न राहणार आहे.
पिकांची परिस्थिती लक्षात घेऊन मागील आठवड्यामध्ये जिल्हाधिकारी यांना केलेल्या सूचनेप्रमाणे जिल्हा सनियंत्रण समितीची बैठक झाली असून 25 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील 11 महसूल मंडळातील नुकसानीचा अहवाल देण्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे. 21 दिवसापेक्षा अधिकच्या पावसातील खंडामुळे जिल्ह्यातील इतर महसूल मंडळे देखील निकषा प्रमाणे अग्रीम नुकसान भरपाई साठी अधिसूचित करण्यात येतील. यामध्ये आज आणखीन 13 मंडळाची भर पडली आहे.