तहसीलदार व पोलिस निरीक्षक यांना निवेदन
प्रतिनिधी / वाशी
पोलिस पाटलांच्या प्रलंबित मागण्या मान्य करण्यासाठी व मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र गावकामगार पोलिस पाटील संघाच्या वतीने मुंबईतील आझाद मैदान येथे उपोषण व धरणे आंदोलन करण्यात येत आहे. संघटनेचे राज्य अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली २८ नोव्हेंबर ते १ डिसेंबरपर्यंत हे आंदोलन करण्यात येणार असून, वाशी तालुक्यातून २५ पोलिस पाटील आंदोलनात सहभागी होणार आहेत. तालुका पोलिस पाटील संघाच्या वतीने याबाबतचे निवेदन तहसीलदार व पोलिस निरीक्षक यांना देण्यात आले. यावेळी नितीन देशमुख, उमेश येडे , विनोद क्षीरसागर यांच्यासह तालुक्यातील पोलिस पाटील उपस्थित होते.
मागण्यांची दखल घ्या
पोलीस पाटलांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. यासंदर्भात बोलताना संघाचे नितिन देशमुख म्हणाले की वारंवार पाठपुरावा करून देखील राज्य सरकार आमच्या मागण्यांची दखल घ्यायला तयार नाही. त्यामुळे संघाने धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. आतातरी शासनाने आमच्या मागण्यांची दखल घेऊन न्याय द्यावा.