पालक संतापले, प्राचार्यावर बडतर्फीची कारवाई न झाल्यास शाळेसमोर आंदोलन,
आरंभ मराठी / धाराशिव
शहरातील पोदार इंटरनॅशनल स्कुलमध्ये गेल्या आठवड्यात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे, शाळेतील एका शिक्षकानेच शाळेतील शिक्षिकेवर लैंगिक अत्याचार केला असून, त्याच्यावर आनंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अत्याचार करणाऱ्या हैदर अली शेख नामक शिक्षकाचे शाळेतील विद्यार्थ्यांबाबतचे संशयास्पद, अशोभनीय वर्तन लक्षात आल्यानंतर पालकांनी प्राचार्यांकडे तसेच वरिष्ठ कार्यालयाकडे लेखी तक्रार केली होती. मात्र, तक्रारीनंतर कारवाईऐवजी प्राचार्यांनी शिक्षकाला बेस्ट टिचर अवॉर्ड देऊन सन्मानित केले. एकप्रकारे नराधम शिक्षकाला प्राचार्यांनी प्रोत्साहन दिले असून, प्राचार्य मॅडमला दोन दिवसांत बडतर्फ करावे, अन्यथा शाळेसमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा पालकांनी दिला आहे.
यासंदर्भात पालकांनी संस्थेच्या वरिष्ठ कार्यालयाकडे मेलद्वारे तक्रार केली असून, त्यात शाळेच्या एकूण गैरकारभाराचा लेखाजोखा मांडला आहे. पोदार ही नामांकित शाळा असून, शाळेत अद्ययावत शिक्षण प्रणालीसोबतच स्वच्छता, शिस्त, सुरक्षा आणि संस्कारक्षम वातावरण अभिप्रेत आहे.त्यामुळेच शहरातील पालकांनी आपल्या पाल्यांना मोठ्या संख्येने शाळेत प्रवेशित केले. काही वर्षे नावाप्रमाणे शाळेने ही शिस्त जपली.मात्र अलीकडच्या काळात शाळेत काही शिक्षकांकडूनच व्याभिचार वाढला आहे.त्यामुळे शैक्षणिक गुणवत्तेचा ऱ्हास होतानाच शिस्तही मोडली आहे. गेल्या काही वर्षांत शाळेच्या एकंदर व्यवस्थापनाबद्दल पालकांमध्ये नाराजीचा सूर पहायला मिळत होता.
काही निवडक शिक्षक मनमानी कारभार करत असून, विशेषत:मुलींना शेरेबाजी करण्याचे प्रकार वाढले होते.या पार्श्वभूमीवर पालकांनी पोदार शाळेच्या व्यवस्थापनाकडे तक्रार केली होती. त्यात संशयास्पद वर्तन असलेल्या हैदर अली शेख नामक शिक्षकाचा उल्लेख करण्यात आला होता.शाळा प्रशासनाने किंवा वरिष्ठ स्तरावरून संबंधित शिक्षकावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. उलट या शिक्षकाला काही महिन्यांपूर्वी बेस्ट शिक्षक म्हणून सन्मानित करण्यात आले. ज्या शिक्षकाचे वर्तन अत्यंत लांच्छनास्पद आहे, अशा शिक्षकाला शाळेच्या प्राचार्या मॅडम पुरस्कार देऊन प्रोत्साहन देत असल्याने सगळा प्रकार आणि शाळेचा कारभारच संशयास्पद असल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
विशेष म्हणजे ज्या शिक्षकाची पालकांनी तक्रार केली होती त्याच शिक्षकाने शाळेतील शिक्षिकेवर लैंगिक अत्याचार केला असून, सध्या हा शिक्षक पोलिस कोठडीत आहे. मात्र,पालकांच्या तक्रारीनंतर संबंधित शिक्षकावर तातडीने कारवाई झाली असती तर पुढील अनर्थ नक्कीच टळला असता, असे पालकांना वाटते. शाळेतील या प्रकारानंतर अनेक पालक भेदरले असून, आपल्या पाल्यांना शाळेत पाठवावे की नाही, अशी काही पालकांची मानसिकता झाली आहे. शनिवारी सायंकाळी शहरातील पालकांनी मिटिंग घेऊन आंदोलनाची दिशा स्पष्ट केली आहे. शेवटचा पर्याय म्हणून पालकांनी वरिष्ठ कार्यालयाला निवेदन पाठवले आहे.
कारवाई न झाल्यास शाळा बंद पाडू
प्राचार्या मॅडम अशा शिक्षकांना प्रोत्साहन देत आहेत. आणखी एका शिक्षकाबद्दल आमची तक्रार असून, त्यादृष्टीने चौकशी करणे गरजेचे आहे. आम्ही पालकांनी केलेल्या तक्रारीला बेदखल करणाऱ्या प्राचार्यांवर पोदार शाळेच्या व्यवस्थापनाने तातडीने कारवाई करावी, अन्यथा आम्ही शाळेसमोर दोन दिवसांत आंदोलन करूच, शिवाय शाळाही बंद पाडू, असा इशारा पालकांनी शाळेच्या वरिष्ठ कार्यालयाकडे ईमेलद्वारे शनिवारी सायंकाळी दिला आहे.
बदलापूर प्रकरणानंतरही शाळा प्रशासन गंभीर नाही,
काही महिन्यांपूर्वी बदलापूरमध्ये एका शाळेत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची संतापजनक घटना समोर आली होती. त्यानंतर शासनाने प्रत्येक शाळेत मुलींच्या सुरक्षेची काळजी घेण्याचे आदेश दिले होते. तसेच सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यास सांगितले होते.संतापजनक घटनेनंतरही धाराशिव जिल्ह्यातील शाळांमध्ये गैरवर्तनाचे प्रकार घडत असून, पोदारसारख्या नामांकित संस्थेच्या शिक्षकाचे वर्तन संशयास्पद असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. शिक्षण विभागासह प्रशासन, सामाजिक संस्था, राजकीय पक्ष या प्रकाराकडे दूर्लक्ष का करत आहेत, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
घटनेशी शाळेचा संबंध नाही, शिक्षकावर कारवाई केलीय,
जी घटना घडली आहे ती पोदार शाळेच्या शिक्षकाची खाजगी बाब आहे. या घटनेशी शाळेचा संबंध नाही. शाळेकडून दोन्ही शिक्षकांवर अगोदरच कारवाई केली आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला आणि सुरक्षेला शाळा प्राधान्य देत आली आहे. त्या शिक्षकाविरोधात एकाच पालकाची तक्रार होती. त्याची दखल घेऊन शाळेने त्याचवेळी त्यांच्याकडून खुलासा घेतला होता. आता घडलेला प्रकार शाळेशी संबंधित नसून, शाळेत काम करणाऱ्या शिक्षकाचा तो खाजगी प्रकार आहे.
–रम्या तुतीका, प्राचार्या, पोदार इंटरनॅशनल स्कुल,