आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठपुराव्याने प्रश्न मार्गी
आरंभ मराठी/ धाराशिव
गेल्या 6 वर्षांपासून धाराशिवचे विमानतळ नावालाच उरले होते. धावपट्टी उखडून खडी वर आल्याने 6 वर्षात या विमानतळावर एकही विमान उतरू शकले नाही.धावपट्टीअभावी वैमानिक प्रशिक्षण केंद्रही गुजरातला स्थलांरित झाले.विमानतळाचा वापर करता येत नसल्याने केंद्रीय तसेच राज्यातील मंत्र्यांसह पक्षाचे वरिष्ठ नेते, उद्योजकांना जिल्ह्यात येण्यासाठी अडचण होत होती. या पार्श्वभूमीवर आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी सरकारकडे पाठपुरावा करून विमानतळाचा प्रश्न मार्गी लावला असून,धावपट्टीची दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता विमानांचे लँडिंग आणि टेक ऑफ होईल.
धाराशिव विमानतळावर विमान उतरत नसल्याने वरिष्ठ नेते,मंत्री तसेच उद्योजकांना लातूर येथील विमानतळावर लँडिंग करावे लागत होते.धाराशिव प्रमाणेच राज्यातील काही विमानतळाच्या धावपट्टीची दुरवस्था झाली होती. यासंदर्भात पावसाळी अधिवेशनात तत्कालिन आमदार अशोक चव्हाण यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धावपट्टी दुरुस्ती करण्यात येईल असे आश्वासन दिले होते.
आमदार राणा पाटील यांनी घेतली होती अधिकाऱ्यांची बैठक
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अखत्यारित यवतमाळ, नांदेड, लातूर, धाराशिव आणि बारामती येथील विमानतळे आहेत. त्यापैकी नांदेड, लातूर आणि धाराशिव ही विमानतळे शासनाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे व्यवस्थापन व देखभालीसाठी हस्तांतरित केली होती. यवतमाळ व बारामती येथे विमानतळ विकसित करण्यासाठी शासन व महामंडळाने जमिन संपादन व पायाभूत सुविधांवर भांडवली खर्च केला आहे.धाराशिव विमानतळाच्या 2200 मीटर विस्तारीकरणासाठीची मागणी यापूर्वीच लोकप्रतिनिधींकडून करण्यात आली होती. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी 6 महिन्यापूर्वीसंबधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती.धावपट्टी दुरुस्तीबद्दल आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी सरकारचे आभार मानले आहेत. दरम्यान आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी बुधवारी सायंकाळी या विमानतळाच्या धावपट्टीची पाहणी केली. यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजे निंबाळकर आदी उपस्थित होते.