शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांचा ठाकरे गटाचे खासदार, आमदारांसह माजी नगराध्यक्षांवर आरोप
प्रतिनिधी / धाराशिव
राज्यातील अनेक शहरांमध्ये भुयारी गटार योजना कुचकामी ठरल्याचे निष्पन्न झालेले असताना माजी नगराध्यक्षांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात धाराशिव शहरात ही योजना सुरू केली. जनतेची मागणी नसताना केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी ठाकरे गटाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील आणि माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी ही योजना राबविली. सध्या शहरामध्ये सर्वत्र निर्माण झालेले चिखलाचे साम्राज्य हे या तिघांचेच पाप असून हे तिघेच या योजनेचे लाभार्थी आहेत. रस्त्यावरील चिखलामुळे जनतेला त्रास होत असल्यामुळे आता काही लोकांना पुढे करून स्वतःच आंदोलन करीत असल्याची आरोप शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी केला. यासंदर्भात ठाकरे गटाच्या वतीने अजून प्रतिक्रिया आलेली नाही.
शासकीय विश्रामगृहात बुधवारी (दि.26) भुयारी गटार योजनेच्या अनुषंगाने झालेल्या पत्रकार परिषदेत श्री.साळुंके यांनी ठाकरे गटाचे खासदार, आमदार व माजी नगराध्यक्षांवर सडकून टीका केली. ते म्हणाले की, भुयारी गटार योजनेमध्ये सिमेंट रस्त्याची कामे नमूद असताना एवढे दिवस ते का गप्प बसले?,पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी शहरातील परिस्थितीचा आढावा घेऊन मुख्याधिकार्यांशी चर्चा केली. त्यानंतर शहरातील अत्यावश्यक पंधरा ठिकाणच्या रस्त्यावर तत्काळ मुरूम टाकण्याच्या सूचना दिल्या आहेत. वास्तविक शहरातील रस्त्यांवर चिखल, घाण हे खासदार, आमदार आणि माजी नगराध्यक्षांमुळेच झालेले आहे. भुयारी गटार योजनेचे हे तिघेच खरे लाभार्थी आहेत. जनतेला याचा कसलाही फायदा झालेला नाही. तरीही कार्यकर्त्याना ठाकरे गटाचे लोकप्रतिनिधी सरकारविरोधात बोंब मारायला लावून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
पालकमंत्री महोदयांनी नागरी दलितेत्तर वस्ती सुधार योजना, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना, महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत सुमारे 25 कोटी रूपयांची रस्त्याची कामे मंजूर करुन घेतलेली आहेत. तसेच शिंदे-फडणवीस सरकारने धाराशिव शहरातील 4 उद्याने, आठवडी बाजारासाठी 5 कोटी व रस्ते साठी 2 कोटी रूपये निधीची घोषणा कालच केलेली आहे. त्याचा आदेश 2 दिवसात येईल. शहराच्या विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत हे सक्षम आहेत. त्यामुळे ठाकरे गटाच्या लोकांनी काळजी करू नये, असा टोलाही त्यांनी लगावला.
त्याचबरोबर शहरातील विविध भागात नऊ मीटरचे 60 रस्ते आणि नाल्यांसाठी 157 कोटी रूपये निधीची मागणी केली असून लवकरच त्याला मंजुरी मिळून कार्यारंभ आदेश काढण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.