प्रतिनिधी / कळंब
कळंब शहरापासून अवघ्या चार किलोमिटर अंतरावर असलेल्या माळेगाव येथे मशनरी स्टोअर्स व मेडिकलचे अज्ञात चोरट्यांनी शटर वाकवून फोडल्याची घटना मंगळवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास घडली. चोरट्यांनी मशिनरीच्या दुकानातून ११ हजार ५०० रुपये चोरुन नेले आहे. सदरील चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून युसुफ वडगाव पोलीसांनी घटनास्थळी भेट दिली.
गणेश बिभिषण चिरके यांचे गावात गणेश ट्रेडर्स ॲन्ड मशिनरी दुकान आहे. सोमवारी रात्री ते नेहमीप्रमाणे दुकान बंद करून गेले. तर नोकर दुकानात झोपलेला होता. पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दुकानेचे शटर वाकवून ते आतमध्ये घुसले गल्ल्यातील रोख रक्कम ११ हजार ५०० चोरून नेले. परंतु आवाज आल्याने बाजुला झोपलेल्या नोकराला जाग आली. आवाज आला म्हणून तो पाहाण्यासाठी आला असता तिघे जण दिसून आले. नोकराने आरडाओरडा केल्याने चोरटे पसार झाले. दुसरी घटना सूर्डी फाट्यावर असलेले ज्ञानेश्वर राजाभाऊ गिरी यांच्या मेडिकलचेही त्याच पध्दतीने शटर वाकवून चोरटे दुकानात घुसले पण तेथे त्यांच्या काहीच हाती लागले नाही. घटनेची माहिती मिळताच युसुफ वडगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी डोंगरे आणि गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. एकाच रात्रीत दोन दुकाने फुटल्याची घटना घडल्याने माळेगाव ( ता. केज ) येथील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.