प्रतिनिधी / धाराशिव
एकीकडे शहरातील रस्त्यांची आधीच दुरवस्था झालेली असताना नगरपालिकेने भुयारी गटार योजनेच्या नावाखाली जवळपास 70 टक्के भागात खोदकाम केले आहे. त्यामुळे रस्त्यांची अधिकच दुर्दशा झाली आहे. सध्या पावसामुळे नागरिक बेहाल असून,खोदकाम केलेल्या रस्त्यांची दुरुस्ती होत नसल्याने वाहने घसरून अपघात होत आहेत तसेच नागरिकांना चालताही येत नाही. त्यामुळे नगरपालिकेविरुद्ध संतापाची लाट आहे. याचा परिणाम सोमवारी सकाळी नगरपालिकेत दिसून आला. नागरिकांनी चिखल टाकून पालिकेचा निषेध नोंदविला, शिवसैनिक प्रशांत साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. दरम्यान शहरातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती न झाल्यास तसेच नाल्यांची साफसफाई न झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
शहरातील वेगवेगळ्या भागात भुयारी गटार योजनेचे काम प्रगतीपथावर आहे, या योजनेसाठी अंतर्गत आणि मुख्य रस्त्यांचे खोदकाम करण्यात येत आहे. मात्र योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित ठेकेदाराने खोदकाम केलेल्या रस्त्यांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. तशी तरतूद निविदेत करण्यात आलेली आहे. असे असूनही ठेकेदारांकडून रस्त्याची दुरुस्ती केली जात नाही आणि पालिकाही याबाबत गांभीर्याने लक्ष घालत नाही. सध्या पावसाचे दिवस सुरू झाले असून, शहरातील खोदकाम केलेल्या रस्त्यांवरून मार्ग शोधताना नागरिकांची दमछाक होत आहे. रस्त्यांच्या मधोमध पाडलेल्या चारीत वाहने अडकत असून,दुचाकी,सायकलीला चिखल अडकत असल्याने नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. नागरिकांनी नगरपालिकेला वारंवार सांगूनही काहीच फरक पडत नाही.त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी सोमवारी सकाळी नगर परिषदेच्या आवारात चिखल टाकून पालिकेचा निषेध केला. यावेळी शिवसेनेचे उपशहर प्रमुख प्रशांत बापू साळुंके यांच्यासह मिल्ली कॉलनी,शाहू नगर,सुलतानपुरा आदी भागातील नागरिक उपस्थित होते. यावेळी बोलताना बापू साळुंखे म्हणाले की नगरपालिकेने जाणीवपूर्वक काही भागातील रस्त्यांची कामे तसेच विकासाची कामे केली नव्हती आता आहे त्या रस्त्यांची भुयारी गटारी योजनेमुळे वाट लागली आहे त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत शहरातील वेगवेगळ्या भागात नाल्याच्या स्वच्छतेचे काम ठप्प आहे. लवकरात लवकर रस्ते दुरुस्ती आणि नाल्याची सफाई न झाल्यास नाल्यातील घाण पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात टाकणार आहोत.यावेळी पालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.