आरंभ मराठी / धाराशिव
उंबरे कोठा येथील रहिवाशी संदीप गोरे हे पांगरी येथे आरोग्य विभाात ब्रदर म्हणून नोकरी करतात. गुरुवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ड्युटी संपवून ते घरी येत असताना साईराम नगर येथे मुख्य रस्त्यावरच वायर बांधले होते. अंधारात गोरे यांना हे वायर दिसले नाही.
त्यामुळे हे वायर त्यांच्या गळ्याला लागून ते गाडीवरून खाली पडले. त्यांच्या मागे आलेल्या गाड्या थांबल्यामुळे लूटमार झाली नाही. परंतु गोरे यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना धाराशिव येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. हा सर्व लूटमार करण्याचा प्रयत्न होता.परंतु गोरे हे खाली पडल्यामुळे त्या ठिकाणी लगेच दुसऱ्या गाड्या येऊन थांबल्यामुळे लूटमार झाली नाही. दरोडेखोरांची दहशत आता शहरापर्यंत आली असून, त्याचा बिमोड करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
तीन महिन्यापूर्वी आंबेहोळ येथील वृद्ध दाम्पत्याला असेच मारहाण करून लुटल्याचा प्रकार घडला होता. त्यातील आरोपींना पोलिसांनी चारच दिवसांत बेड्या ठोकल्या होत्या. साईराम नगर येथे घडलेल्या या घटनेमुळे त्या परिसरातील लोकांमध्ये तसेच वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून लुटमारी करणाऱ्या आरोपींचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करत आहेत.
संदीप गोरे यांनी या प्रकरणात अजून गुन्हा दाखल केला नव्हता. शहरात दररोज रात्री अपरात्री शहराशेजारील गावातील नागरिकांना ये-जा करावी लागते. असे प्रकार रात्री ९ -१० वाजताच घडू लागल्याने दहशत वाढली आहे.या घटनेचा तातडीने शोध घेऊन आरोपींच्या मुसक्या आवळाव्यात, अशी मागणी होत आहे.