प्रतिनिधी / धाराशिव
आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक, शिक्षणमहर्षी गुरुवर्य के.टी. पाटील उर्फ बप्पा यांच्या जयंतीनिमित्त आज सोमवारी सकाळी 11 वाजता धाराशिव शहरातील श्रीपतराव भोसले हायस्कूलच्या प्रांगणात पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार असून, या सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमासोबतच सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
गुरुवर्य के.टी. पाटील बप्पा यांचे शैक्षणिक क्षेत्रातील मोठे योगदान असून, धाराशिवसारख्या ग्रामीण भागात त्यांनी गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली.त्यांनी उभारलेल्या संस्थेचा आज मोठा विस्तार पहायला मिळतो आहे. संस्थेत शिक्षण घेऊन बाहेर पडलेले हजारो विद्यार्थी वेगवेगळ्या पदावर कार्यरत आहेत. या सर्व विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने के.टी. पाटील यांच्या पुतळ्याची उभारणी करण्यात आली आहे. या पुतळ्याचे दिमाखदार कार्यक्रमात आज अनावरण होत आहे. श्रीपतराव भोसले हायस्कूलच्या प्रांगणात होणाऱ्या या कार्यक्रमासाठी भव्य मंडप उभारण्यात आला असून, 24 हजार खुर्च्यांची सोय करण्यात आली आहे. सकाळी 11 वाजता मुख्य कार्यक्रम सुरू होणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी केले आहे.