आरंभ मराठी / धाराशिव
पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी अत्यंत क्रूर पद्धतीने देशबांधवांना मारल्यानंतर भारत सरकारने ऑपरेशन सिन्दुर राबवून अतिरेक्यांना तसेच पाकिस्तानला धडा शिकवला. ऑपरेशन सिन्दुरचा सन्मान आणि गौरव करत देशभर सर्वत्र तिरंगा रॅली काढण्यात येत आहे.धाराशिव शहरात शिवसेनेच्या पुढाकारातून गुरुवारी भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह शहरातील महिला, शाळा,महाविद्यालयाचे विद्यार्थी, विविध क्षेत्रातील नागरिकांसह वारकरी मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये सहभागी झाले होते.
शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुरज साळुंके, जिल्हा संघटक सुधीर पाटील यांच्या नेतृत्वात ही रॅली काढण्यात आली. राष्ट्रमाता जिजाऊ चौक येथून रॅलीला सुरुवात झाली. वाहनावर भारतीय जवानांच्या वेशभूषेत विद्यार्थी लक्ष वेधून घेत होते. प्रत्येकाच्या हातात अभिमानाचे आणि शौर्याचे प्रतीक असलेला तिरंगा ध्वज डौलत होता. देशभक्तीपर गीतांनी प्रत्येक धाराशिवकरांचा ऊर भरून येत होता. राजमाता जिजाऊ चौकापासून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत रॅलीमध्ये देशभक्तीच्या घोषणांनी आसमंत भारावून गेला होता.