■ धाराशिव जिल्ह्यातील हजारो नागरिकांनी केली होती गुंतवणूक
■ नोकरदारांसह शेतकरी, शेतमजुरांचा समावेश
सचिन दराडे / तेरखेडा
ऑनलाइन फसवणुकीचा आणखी प्रकार समोर आला आहे. वारंवार फसवणुकीच्या घटना घडत असतानाही नागरिक कमी कालावधीत अधिक नफ्याच्या बहाण्याने स्वतःची फसवणूक करून घेत आहेत. जिल्ह्यातील हजारो नागरिकांना एका ऑनलाईन कंपनीने कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला असून,यामध्ये नोकरदारांसह सामान्य नागरिकांचा समावेश आहे. दरम्यान या फसवणुकीनंतर कोणीही तक्रार देण्यास पुढे आलेले नाही हे विशेष.
चार दिवसांत चारपट रक्कम देण्याच्या बहाण्याने ऑनलाइन कंपनीने अनेकांना चुना लावला असून, या कंपनीने विश्वास संपादन करण्यासाठी काही दिवस लोकांना चार पट रक्कम दिली होती. एकीकडे सर्वसामान्य नागरिक, अशिक्षित नागरिक यांच्या अडाणीपणाचा फायदा घेऊन ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार सर्वत्र होत आहेत . मात्र आता सुशिक्षित, शिक्षक, डॉक्टर,पोलीस, व्यावसायिक, उद्योजक या सगळ्यांनाच या कंपनीने जाळ्यात ओढले आहे.
अशी आहे फसवणुकीची पद्धत
एक ऑनलाईन कंपनी बाजारात येते गुंतवणूक करून कमी दिवसांमध्ये जास्तीत जास्तीचा परतावा देण्याची एक साखळी निर्माण केली जाते. या साखळीमध्ये सुशिक्षित उद्योजक व्यावसायिक, शिक्षक, डॉक्टर,पोलीस अशा सर्वच क्षेत्रातील लोकांना कमी दिवसात जास्तीत जास्त परतावा देण्याच्या बहाण्याने कंपनी गुंतवणूक करण्यास भाग पाडते.
सुरुवातीला कंपनीकडून गुंतवणूक करणाऱ्या सर्वच सभासदांना रोखीने परतावा दिला जातो आणि सर्व सभासदांचा विश्वास संपादित केला जातो. कमीत कमी दिवसात जास्तीत जास्त परतावा मिळण्याच्या अपेक्षेने सर्वच लोक या कंपनीमध्ये गुंतवणूक करतात आणि सुरुवातीला कंपनी परतावा देत असल्यासारखं दाखवते मात्र सगळ्यांना आकर्षित करून अचानकपणे लाभार्थ्यांना परतावा देणे बंद करते. असाच प्रकार एका ऑनलाइन कंपनीकडून विशेषतः धाराशिव जिल्ह्यात घडला आहे. दरम्यान या कंपनीने दोन दिवसापासून परतावा देणे बंद केले असून, लाखो गुंतवणूकदार अडचणीत आले आहेत. मात्र यासंदर्भात कोणीही तक्रार दाखल केलेली नाही.