आरंभ मराठी / धाराशिव
भारतीय जनता पार्टीचे तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी तथा जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला. त्यांना उस्मानाबाद लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली असून, आता महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर विरुद्ध महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्यात म्हणजे दीर- भावजयीमध्ये थेट लढत होणार आहे.
उस्मानाबाद लोकसभेसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून ओमराजे निंबाळकर यांची उमेदवारी यापूर्वीच जाहीर करण्यात आली होती. महायुतीचे उमेदवार कोण याबाबत उत्सुकता लागली होती. अखेर भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली असून, गेल्या वेळी दोन भावांमध्ये झालेला सामना आता दीर विरुद्ध भावजय असा होणार आहे.अर्चनाताई पाटील यांनी मुंबईत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर धाराशिव शहरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून जल्लोष सुरु झाला.