राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अशोक जगदाळे यांची मागणी
प्रतिनिधी / नळदुर्ग
शहरात नगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या विकास कामांची चौकशी होईपर्यंत त्या कामांचे बील काढण्यात येऊ नये, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य अशोक जगदाळे यांच्यासह शहरातील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, नळदुर्ग शहरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परीक्षेत्रात अधिसुचित विशिष्ट नागरी सेवा पुरविणे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना, नागरी दलित वस्ती सुधार योजना, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजना व वैशिष्ट्यपुर्ण योजनेअंतर्गत शहरात विविध ३२ कामांकरीता ७ कोटी ५० लाख रुपयांचा निधी शासनाने मंजुर केला होता. या निधीतुन कामे करण्यात येत आहेत. सदरील कामे निकृष्ठ दर्जाची करून ठेकेदारांनी शासनाची व नागरिकांची फसवणुक केली असून, त्यामुळे झालेल्या कामांची चौकशी करण्यात यावी. ४० टक्के रक्कम वाढवुन रस्ते बनविण्यात आले आहेत. यामुळे शासनाच्या निधीचा जास्तीचा वापर होऊन नुकसान झाले आहे. शहरात करण्यात आलेले सिमेंट रस्ते हे निकृष्ट दर्जाचे व अंदाजपत्रकात दर्शविल्ल्याप्रमाणे होत नाहीत.सदरील कामे केली जात असताना नगरपालिकेचा अभियंता काही कामांचा अपवाद वगळता इतर कामांवर जातीने हजर राहिला नाही. सर्व कामे मुळ गुत्तेदार न करता पोट गुत्तेदार करत आहे. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करता तसेच शासनाचे नुकसान टाळण्यासाठी सदरील कामांची त्रयस्तामार्फत चौकशी करावी, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य अशोक जगदाळे, माजी नगराध्यक्ष नितीन कासार, माजी नगरसेवक शरीफ शेख, शब्बीर कुरेशी, महालिंग स्वामी, अमृत पुदाले, विकास सोसायटीचे चेअरमन संजय बेडगे, व्हाईस चेअरमन ताजोद्दीन सय्यद सरदार सिंग ठाकूर, संतोष पुदाले, शिवाजी धुमाळ, राजकुमार खद्दे, अफसर जमादार व संजय दुबे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.