कार्यकर्त्यांना सांगितली पक्षाची अडचण, म्हणाले, संयम पाळा, राजीनाम्यासह टीकाही टाळा
आरंभ मराठी / धाराशिव
पक्षाचे अध्यक्ष अजित पवारांनी सांगितल्यानुसार लोकसभा मतदारसंघासाठी सहा महिन्यांपासून तयारीला लागलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा.सुरेश बिराजदार यांचे तिकिट कापून ऐनवेळी भाजपातून प्रवेश केलेल्या अर्चनाताई पाटील यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आल्याने स्वभाविकच प्रा.बिराजदार यांच्यासह कार्यकर्ते नाराज झाले. सोशल मीडियावर कार्यकर्त्यांकडून टीका तसेच राजीनामा सत्र सुरू झाले. या पार्श्वभूमीवर प्रा.बिराजदार यांनी शुक्रवारी कार्यकर्त्यांची बैठक घेतली आणि कार्यकर्त्यांना पक्षाची अडचण सांगून संयम पाळा तसेच राजीनामा किंवा टीका करू नका, असे आवाहन केले. उमेदवारीचा दावेदार असूनही प्रा.बिराजदार यांनी मनाचा मोठेपणा दाखवल्याने कार्यकर्ते म्हणाले,दाजी तुम्ही तिकिटाच्या स्पर्धेत हरलात तरी आमच्या मनात जिंकलात !.
सुरेश बिराजदार यांनी मतदार संघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेतली. बैठकीत मार्गदर्शन करताना प्रा.बिराजदार म्हणाले, सहा महिन्यांपासून आपण लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. सर्वसामान्य नागरिकांसह विविध क्षेत्रातील सर्वपक्षीय व्यक्तींचा भरभरून प्रतिसाद मिळत होता. परंतु राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी लोकसभा उमेदवाराबाबत जो निर्णय घेतलेला आहे तो आपणा सर्वांना मान्य करावा लागणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राजीनामा देणे किंवा सोशल मीडियावर चुकीच्या पद्धतीने व्यक्त होऊन नाराजी व्यक्त करणे हे प्रकार तत्काळ थांबवावेत. कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा.
यावेळी कार्यकर्त्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. मागील सहा महिन्यापासून निवडणुकीची तयारी करत असताना ऐन उमेदवारी निश्चित करण्याच्या वेळी तयार उमेदवाराला डावलून इतर पक्षातील इच्छूक उमेदवार पक्षात प्रवेश देऊन उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने राष्ट्रवादीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. मागील 40 वर्षापासून एकनिष्ठ राहून पक्ष अडचणीत असताना पक्ष संघटना वाढवण्याचे निस्वार्थपणे काम करणाऱ्या सुरेश बिराजदार यांच्या सोबत असा प्रकार घडत असेल तर पक्षात राहणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची काय स्थिती असेल अशी भीती अनेक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
काय म्हणाले बिराजदार.?
बोलताना सुरेश बिराजदार म्हणाले की, अजित पवारांचा विकासात्मक दृष्टिकोन पाहून आपण त्यांच्या समवेत काम करत आहोत. राज्याला त्यांच्यासारख्या विकासाभिमुख नेतृत्वाची आवश्यकता आहे. त्यांना संघर्षाच्या काळात एकटे पाडण्याचे प्रयत्न होत आहेत. आपण सर्वजण त्यांचे कुटुंबीय बनून त्यांना साथ देण्याची गरज आहे. पुढील काही दिवसात अजितदादा आपल्याशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे यापुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राजीनामा देणे किंवा सोशल मीडियावर चुकीच्या पद्धतीने व्यक्त होऊन नाराजी व्यक्त करणे, हे प्रकार तत्काळ थांबवावेत.
या कार्यकर्त्याची उपस्थिती
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सुरेश पाटील, ज्येष्ठ नेते भास्कर दादा खोसे, युवक जिल्हाध्यक्ष दिग्विजय शिंदे , पदवीधर विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष नितीन बागल ,जिल्हा कार्याध्यक्ष ऍड.प्रवीण यादव, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत नवगिरे, जिल्हाध्यक्ष असद पठाण, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष बाळासाहेब स्वामी, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष दुर्गेश साळुंखे सोशल मीडिया माजी जिल्हाध्यक्ष सुहास मेटे ,ेवादल जिल्हाध्यक्ष सतीश घोडेराव , योग जिल्हा कार्याध्यक्ष मनोज जगताप, वाशी तालुकाध्यक्ष ऍड. सूर्यकांत सांडसे, लोहारा तालुकाध्यक्ष सुनील साळुंखे, भूम तालुका अध्यक्ष ऍड. रामराजे साळुंखे, बार्शी तालुकाध्यक्ष विक्रम सावळे, तुळजापूर तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण सूर्यवंशी, उमरगा तालुका अध्यक्ष बाबा जाफरी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य किशोर साठे, उमरगा लोहारा विधानसभा अध्यक्ष विजयकुमार लोमटे, लोहारा शहराध्यक्ष व उपनगराध्यक्ष आयुब शेख, जिल्हा उपाध्यक्ष बाबा शेख, नगरसेवक भागवत कवडे, नगरसेवक जालिंदर कोकणे, जयंत देशमुख, लोहारा तालुका उपाध्यक्ष प्रशांत सोमवंशी, तालुका संघटक वैजनाथ कागे, बार्शी शहराध्यक्ष संताजी सावंत, सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष अमोल बदे, सरपंच महिला जिल्हा उपाध्यक्ष तथा सरपंच सुनिताताई पावशेरे,यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.