दिशा समितीच्या बैठकीत महामार्ग प्राधिकरण अधिकार्यांनी दिले आश्वासन, शिवसेना शहरप्रमुख सोमनाथ गुरव यांनी केले होते आंदोलन
प्रतिनिधी / धाराशिव
शहरातून जाणार्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत बायपास रस्ता पूर्ण न झाल्यामुळे विरूध्द दिशेने ये जा करावी लागत असून त्यामुळे आनेक अपघात झाले आहेत.त्यामुळे अजून किती बळी घेणार असा संतप्त सवाल खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अधिकाऱ्यांना विचारला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी सर्व्हिस रोड, चारचाकी वाहनासाठी भुयारी मार्गासह (अंडर पास) पथदिव्याचा प्रश्न तातडीने सोडविण्याचे आश्वासन दिले असून,त्यामुळे नागरिकांची गैरसोय कमी होणार आहे. दरम्यान यासाठी शिवसेनेचे शहर प्रमुख सोमनाथ गुरव यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.
मंगळवारी झालेल्या दिशा समितीच्या बैठकीत या रस्त्याचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर आणखी किती जणांचा जीव जाण्याची वाट तुम्ही बघताय? असा थेट सवाल खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अधिकाऱ्यांना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रतिनिधींना केला. त्यानंतर तत्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी यासाठी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे या प्रयत्नांना यश आल्याची माहिती शिवसेनेचे शहरप्रमुख सोमनाथ गुरव यांनी दिली. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय दिशा समितीची बैठक मंगळवारी पार पडली. या बैठकीस धाराशिव-कळंब मतदारसंघाचे आमदार कैलास घाडगे पाटील व सर्व संबंधित अधिकार्यांची उपस्थिती होती. या बैठकीत धाराशिव शहरासह राष्ट्रीय महामार्गवरुन जाणार्या नागरिकांच्या जीविताशी खेळ करणार्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकार्यांना धारेवर धरण्यात आले. शहरातून जाणार्या या महामार्गावरील बायपास रस्त्यावर पोद्दार इंटरनॅशनल स्कुल, डी-मार्ट व मंगल कार्यालय असल्यामुळे येथे नागरिकांची सतत वर्दळ असते. परंतु येथे बायपास रस्ता नसल्यामुळे नागरिकांना विरूध्द दिशेने प्रवास करावा लागतो. अंधार असल्यामुळे येथे नागरिकांना जीव मुठीत देऊन प्रवास करावा लागत आहे. विशेषतः वाहतुकीची व्यवस्था नसल्यामुळे या भागात नागरी वस्ती देखील वाढत नाही. म्हणून शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी येडशी टोलनाका येथे रास्तारोको आंदोलन करुन बायपास रस्ता होत नाही, तोपर्यंत टोल वसुली करु देणार नाही, असा इशारा दिला होता. तरीही राष्ट्रीय महामार्ग विभागाने दखल न घेतल्यामुळे जनतेमधून तीव्र जनभावना व्यक्त होत होत्या.
दरम्यान, मंगळवारी झालेल्या दिशा समितीच्या बैठकीत या मुद्यावरुन पुन्हा घमासान चर्चा झाली. शिवसेनेचे शहरप्रमुख तथा नगर परिषदेचे माजी गटनेते सोमनाथ गुरव यांनी हा प्रश्न निकाली काढण्याची मागणी केली.
यावेळी खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ. कैलासदादा पाटील यांनी महामार्ग प्राधिकरणच्या अधिकार्यांना या प्रश्नावर धारेवर धरले. आणखी किती जीव जाण्याची वाट बघणार आहात? जीवाशी खेळ करु नका, असे स्पष्ट शब्दांत सुनावले. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अभियंता श्री.कदम यांना तत्काळ कार्यवाही करण्याबाबत सूचना दिल्या. सदरील महामार्गावर सर्व्हिस रोडसाठी 68 कोटीचा निधी मंजूर झालेला असल्याचे त्यांनी सांगितले. याच निधीमधून पोद्दार स्कुल ते वरुडा उड्डाण पुलापर्यंत पर्यायी रस्ता (सर्व्हिस रोड), पथदिवे आणि डी-मार्टजवळ चारचाकी वाहनांसाठी भूमिगत रस्ता (अंडर पास) तयार करण्यात येईल असे स्पष्ट केले. हा प्रश्न मार्गी लागल्यामुळे नागरिकांची गैरसोयीमधून सुटका मिळणार असल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.