- भाग्यश्री मुळे, नाशिक,
नाशिकच्या जयंतीबाई काळे अर्थात काळे आजी. साडी, डोक्यावर पदर, ठसठशीत कुंकू, वय ७७. पण उत्साह मात्र १६ वर्षाच्या मुलीला लाजवेल असा. काळे आजी या मूळच्या दिंडोरीच्या. त्यांचे वडील एक्साइज खात्यात डीवायएसपी. त्यामुळे वरचेवर बदल्या ठरलेल्या. तर आई शिक्षिका. चार बहिणी, चार भाऊ, आई वडील असे जयंती बाईंचे दहा जणांचे कुटुंब. दुसरीत असल्यापासून जयंती यांना पोहण्याची आवड निर्माण झाली.- अहमदनगरला असताना शाळेत जाताना वाटेत लागणारी नदी पोहून पार करायची असा त्यांचा शिरस्ता. त्यातून पाण्याची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. मैत्रिणींबरोबर त्या मधल्या सुटीतही पोहायला जाऊ लागल्या. मोठ्यांचं बघून बघूनच त्या तेव्हा पोहायला शिकल्या. गावकऱ्यांनी मात्र त्यांच्या वडलांकडे जयंतीच्या पोहण्याविषयी तक्रार केली. त्यामुळे वडलांच्या हातचा मार खावा लागला. किती मारलं तरी जयंतीची पाण्याची ओढ कमी व्हायची नाही. नंतर वडलांची मालेगावला बदली झाली. तिथंही शाळा संपल्यावर गिरणा नदी त्यांना खुणवायची. भुसावळला असताना तिथंही तापी नदी होतीच. पोहण्याबरोबरच त्यांना सायकलिंगची देखील आवड होती. ६५ साली वसईच्या चिमाजी अप्पा किल्ला परिसरातील खाडीत देखील त्या पोहल्या. पोहण्याविषयी शिक्षक, त्या त्या गावच्या लोकांच्या तक्रारी येतच होत्या. आपली मुलगी काही ऐकत नाही म्हटल्यावर वडलांनी लेकीचं नववीत असतानाच म्हणजे ६६ साली लग्न लावून दिलं.
जयंतीबाईंचे पतीही एक्साइज खात्यात इन्स्पेक्टर होते. एकदा नव्या सुनेला सासूबाई शेत दाखवायला घेऊन गेल्या. तिथं शेतात विहीर पाहून जयंतीबाई खुश झाल्या. विहिरीत थेट उडी घेऊन त्यांनी पोहायला सुरवात केली. आपल्या सुनेला पोहता येतं याची काहीच कल्पना नसल्याने त्यांच्या सासूबाई घाबरून रडायला लागल्या. नंतर जयंतीबाई वर आल्या. मला पोहता येतं म्हणून मीच उडी मारली असं सांगितल्यावर त्या शांत झाल्या. अर्थात इथून पुढे असं काही करू नको असं बजावण्यास त्या विसरल्या नाहीत. नाशिकला बदली झाल्यावर पाणीटंचाईमुळे धुणी-भांडी करण्यासाठी गंगेवर, नासर्डी नदीवर जावं लागायचे. जयंतीबाई कामं झाली की तिथंही आपली पोहायची हौस भागवायच्या.
जयंतीबाईंच्या या आवडीला अर्धविराम मिळाला तो मात्र मुलांच्या जन्मानंतर. तीन मुलं, दोन मुली, पती, सासूसासरे आणि दीर, नणंदा अशा भरल्या घरात साऱ्यांचं करता करता त्यांना दिवस पुरेनासा झाला. अर्थात आवड माणसाला शांत बसू देत नाही. तसंच झालं. मुलं थोडी मोठी झाली. जबाबदाऱ्या कमी झाल्या. मग मात्र जयंतीबाईंनी मुलाच्या मागे लागून वीर सावरकर जलतरण तलावात रीतसर प्रवेश घेतला. आता नियमित पोहणं सुरू झालं. या गोष्टीलाही आता ३० वर्ष होत आली.
जयंतीबाईंचं पोहण्यातील कौशल्य पाहून तेथील प्रशिक्षक हरी सोनकांबळे यांनी त्यांना ज्येष्ठांसाठी असणाऱ्या जलतरण स्पर्धेविषयी सांगितलं. विविध स्पर्धांसाठी त्यांना पाठवलं. आजवर आजी वर्सोवा समुद्रकिनारा, अमरावती, लखनऊ, पुणे, नाशिक, विशाखापट्टणम, जळगाव, नांदेड, गोवा, मालवण अशा विविध ठिकाणच्या स्पर्धांमध्ये सहभागी झाल्या आहेत.- या सगळ्या स्पर्धांमध्ये त्यांनी सुवर्ण, रौप्य, कांस्य अशी असंख्य पदके जिंकली आहेत.
आजीनी ५० मीटर बटरफ्लाय, १०० मीटर बटरफ्लाय, ५० मीटर ब्रेस्ट स्टोक, फ्री स्टाईल व मिडले आदी विविध प्रकारात बक्षिसे मिळविली आहेत. या कामगिरीबद्दल त्यांचा नाशिक महानगर पालिका, नाशिक पोलीस दल आणि विविध संस्थांतर्फे सत्कार देखील झाला आहे. पोहण्याने आरोग्य चांगले राहते, शरीर बळकट राहते हे माहित असल्याने घरी मुले, मुली, नातवंड यानाही त्यांनी पोहण्याची गोडी लावली आहे. त्यांचे पती देखील निवृत्तीनंतर काही काळ त्यांच्याबरोबर पोहायला यायचे. आता मात्र आरोग्याच्या काही तक्रारींमुळे ते फारसे घराबाहेर पडत नाही.
आजी स्वतःच्या पोहोण्याबद्दल जागरूक असतातच पण तरण तलावावर नव्याने आलेल्या तरुणी, महिला यांना देखील त्या पोहण्यास मदत करतात. भीती घालवून धीर देतात, प्रोत्साहन देतात.(navi umed)