कलाकारांनी तुळजाभवानी मातेचरणी वाहिले चित्रपटाचे पोस्टर
तुळजापूर शहर, परिसरातील कलाकारांना अभिनय करण्याची मिळाली संधी
प्रतिनिधी / धाराशिव
‘बाप ल्योक’ भावस्पर्शी कथानक आणि हृदयस्पर्शी गाण्यांनी गुंफलेला, दोन दिग्गजांनी साकारलेला कमालीचा चित्रपट. काही महिन्यांपूर्वी तुळजापुरात या चित्रपटाचं चित्रीकरण झालंय. येत्या 25 तारखेला हा चित्रपट प्रदर्शित होतोय, त्यानिमित्ताने कलाकारांनी रविवारी चित्रपटाचे पोस्टर्स कुलस्वामिनी तुळजाभवानी चरणी अर्पण केले. यावेळी तुळजापूर शहरातील आणि परिसरातील कलाकार उपस्थित होते.
रोजच्या जगण्यातलं प्रतिबिंब आणि भावभावनांचा संगम, नातं विशाल आणि दृढ करणारं कथानक,असा वडील आणि मुलाच्या नात्यावर आधारलेला बाप ल्योक चित्रपट दोन दिग्गज दिग्दर्शकांनी उभा केला आहे. आजवर निघालेल्या बापावरच्या अनेक चित्रपटांपैकी इतक्या ताकदीचा हा पहिला चित्रपट असेल, असा विश्वास प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे यांनी व्यक्त केला आहे. मंजुळे हे या चित्रपटाचे सादरकर्ते असून मकरंद शशीमधु माने यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केलेला आहे. विठ्ठल काळे यांची चित्रपट कथा असून, काळे यांच्यासह शशांक शेंडे ,नीता शेंडे, पायल जाधव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. विशेष म्हणजे धाराशिवचे जावई असलेले गीतकार वैभव देशमुख यांनी या चित्रपटासाठी 3 गाणी लिहिली आहेत. तुळजापुरातील भगवंत शामराज,डॉ.शिवाजी जेटीथोर, अनिकेत क्षिरसागर , दिनेश क्षीरसागर, वीर गंगणे, स्वीटी डोंगरे, मधुसुदन गंगणे, आयुष जगताप, राघव जगताप, राजेश जगताप, सुनील रोचकरी या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत.
या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते म्हणून अभिनेता शंतनु गंगणे यांनी काम पाहिल आहे.चित्रपटातील तुळजापूर तालुक्याचे सौंदर्य बघून इतर निर्माते, दिग्दर्शक सुद्धा तुळजापूर परिसरात चित्रीकरणासाठी येतील, असा विश्वास शंतनु गंगणे यांनी व्यक्त केला.