उपनगराध्यक्ष म्हणतात, राजीनाम्याबाबत माहिती नाही, शहरात चर्चेला उधाण
प्रतिनिधी / वाशी
नगरपंचायतचे पाणीपुरवठा सभापती विकास पवार यांनी आपल्या पाणीपुरवठा विषय समितीच्या सभापतीपदाचा राजीनामा सोमवारी (दि.८) नगराध्यक्षांकडे दिला. पाणीपुरवठा सभापती असूनही शहरातील पाणीपुरवठा नियोजनात आपल्याला सहभागी करून घेत नसल्याचे कारण देत त्यांनी हा राजीनामा दिला आहे.मात्र उपनगराध्यक्षानी याबाबत आपल्याला काहीही कल्पना नसल्याचे सांगितले आहे.
शहरात मागील काही दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत होता. पाणीपुरवठा सभापती असल्याने पाणीपुरवठाबाबत लोक आपल्याला विचारत आहेत, मात्र पाणीपुरवठाबाबतच्या नियोजनाच्या निर्णय प्रक्रियेत आपल्याला सहभागी करून घेतले जात नसल्याने नागरिकांना उत्तरे देणे जिकिरीचे होत असल्याने पाणीपुरवठा सभापतीपदाचा राजीनामा मंजूर करण्यात यावा, अशी मागणी पवार यांनी पत्राद्वारे नगराध्यक्षाकडे केली आहे.
नेमका विषय काय ?
वाशी शहराला आरसोली येथील साठवण तलावावरून पाणीपुरवठा केला जातो. आर्सोली पाणीपुवठा योजना जीर्ण झाल्याने पाईप लाईन फुटणे, मोटर जळणे , वॉल लीक फिल्टर खराब होणे हे नित्याचे झाले आहे. याचा परिणाम पाणीपुरवठावर होत आहे. त्यामुळे नगरपंचायत कडून नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला असून या प्रस्तावासाठी सोमवारी (दि.८) रोजी विशेष सभा आयोजित करण्यात आली होती.पाणी पुरवठाविषयीच्या विशेष सभा बोलवण्याबाबत आपल्याला कल्पना देण्यात आली नाही व पाणीपट्टी वाढीबाबत आपल्याला अनभिज्ञ ठेवले असल्याचे सभापती विकास पवार यांचे म्हणणे आहे.
पाणीपट्टीत वाढ होणार नाही
नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी विशेष सभा :- आरसोली पाणीपुवठा योजना जीर्ण झाल्याने याचा परिणाम पाणीपुरवठावर होत आहे. त्यासाठी आगामी पन्नास वर्षाचा विचार करून शहरासाठी नवीन विहीर, पाईप लाईन, नवीन फिल्टर, शहरा अंतर्गत पाइपलाइन, नवीन पाणी टाकी यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला असून, मंजुरीसाठी तो अंतिम टप्प्यात आहे. शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची असलेली नवीन पाणीपुरवठा योजनेच्या खर्च मंजुरी व दर निश्चितीसाठी विशेष सभा बोलवण्यात आली होती. याबाबत सर्व सदस्यांना सभेच्या नोटीस देण्यात आलेल्या आहेत. तसेच चालू योजनेच्या पाणीपट्टीत कुठलीही वाढ करण्यात येणार नाही. सभापतींच्या राजीनाम्याविषयी आपल्याला अद्याप माहिती नाही.
– सुरेश कवडे, उपनगराध्यक्ष