पंधरा महिन्यात पाच हजार कोटींचा निधी आणल्याबद्दल युथ फोरमच्या वतीने सन्मान
प्रतिनिधी / धाराशिव
धाराशिव जिल्हा मागास नाही, असे बोलणारे लबाड आहेत. डॉ. पद्मसिंह पाटील यांनी जिल्ह्याला विकासाच्या एका टप्प्यावर आणून ठेवले आहे. शाश्वत पाणी, हक्काचा रोजगार आणि सकारात्मक मानसिकता या तीन महत्वपूर्ण बाबींवर आपला भर आहे. त्यामुळे किती हजार कोटी रूपयांचा निधी आणला, यापेक्षा कोणते उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून विकासाचा हा प्रवास सुरू आहे, हे अधिक महत्वाचे आहे. ठाकरे सरकारच्या काळात रखडलेल्या जिल्ह्याच्या सगळ्या महत्वपूर्ण बाबींना आता वेग आला आहे. आपल्या सर्वांचे प्रेम आणि आशीर्वादामुळे जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलल्याखेरीज राहणार नाही, असा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला.
मागील 15 महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात विविध प्रकल्प आणि योजनांसाठी पाच हजार कोटींपेक्षा अधिकचा निधी खेचून आणल्याबद्दल आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा युथ फोरमच्यावतीने नगरपरिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात रविवारी नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला आमदार शहाजीबापू पाटील, महंत तुकोजीबुवा, महंत मावजीनाथबुवा, जनता बँकेचे अध्यक्ष वसंतराव नागदे, अनंत आडसूळ, डॉ. सतीश कदम यांच्यासह शहर व परिसरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तरूणांनी आयोजित केलेला हा नागरी सत्कार एवढा भव्य असेल याची आपल्याला कल्पना नव्हती. या सत्काराने आपल्याला हत्तीचे बळ मिळाले आहे. डॉ. पद्मसिंह पाटील यांनी केलेल्या विकासकामांची माहिती पुढील पिढीला होणे आवश्यक आहे. ती करून देणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील उसाचे क्षेत्र आज मोठ्या प्रमाणात वाढले आहे. डॉ. पद्मसिंह पाटील यांनी पाटबंधारे मंत्री म्हणून केलेल्या कामाचा हा परीपाक आहे. जिल्ह्यासाठी 10 हजार रोजगार निर्मितीची क्षमता असलेला टेक्नीकल टेक्सटाईल पार्कचा प्रकल्प ठाकरे सरकारमुळे रखडला होता. त्याला आपल्या सरकारने मंजुरी दिली आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्न निकाली निघाला आहे. कृष्णा खोर्यातील सात टीएमसी पाण्याच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्णत्वाकडे जात आहे. पुढील वर्षभरात जिल्ह्यात पाणी दाखल होईल. उर्वरित 14 टीएमसी पाण्यासाठी आपला पाठपुरावा सुरू आहे. आपण सर्वांनी सत्काराच्या माध्यमातून दिलेला आशीर्वाद आणखी काम करण्यासाठी बळ देणारा असल्याचे आमदार पाटील यांनी नमुद केले.
यावेळी प्रा. डॉ. गणेश बेळंबे, प्रा. डॉ. सतीश कदम, पत्रकार अनंत आडसूळ, जनता बँकेचे अध्यक्ष वसंतराव नागदे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रारंभी युथ फोरमच्या ऐश्वर्या सक्राते यांनी प्रास्ताविक केले. दौलत निपाणीकर यांनी सूत्रसंचालन तर आभार सूर्याजी गायकवाड यांनी मानले.
शहाजी पाटील रमले जुन्या आठवणीत
आपल्या राजकीय कारकिर्दीत विधानसभेसाठी पहिली उमेदवारी डॉ. पद्मसिंह पाटील यांनी दिली. डॉ. पाटील यांनी राज्याच्या राजकारणात दिलेले योगदान अनेक उदाहरणांसह शहाजीबापू पाटील यांनी यावेळी सांगितली. मराठवाड्याच्या विकासासाठी डॉ. पद्मसिंह पाटील, शिवराज पाटील चाकूरकर, शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख, शिवाजीराव पाटील निलंगेकर या पाच रत्नांनी मोठे योगदान दिले असल्याचे त्यांनी सांगितले. त्याच समाजसेवेचा वारसा आमदार राणाजगजितसिंह पाटील चालवत आहेत. पाच नाही तर सात हजार कोटी रूपये धाराशिव जिल्ह्यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मिळविले आहेत. आपण स्वतः फडणवीस यांची भेट घेवून धाराशिवकरांच्या मनातील भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात असा कर्तव्यदक्ष आमदार असायला हवा, असे मतही शहाजीबापू पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी नानासाहेब शेळके, विश्वंभर पाटील, प्रताप देशमुख, सुभाष कोळगे, प्रकाश जगताप, बजरंग ताटे, ॲड रामभाऊ गरड, एकनाथ राजेनिंबाळकर, हुंकार बनसोडे, ॲड तानाजी चौधरी, संजय मंत्री, ॲड गजानन चौगुले, बशीर तांबोळी, सुभाष पवार, चन्नू राठोड, प्रभाकर निपानीकर, आबासाहेब सोपान पवार, रजा शेख, भालचंद्र हुच्चे, दत्तात्रय अंबुरे, कल्याण बेताळे, गौतमराव इंगळे, मयुर काकडे, आबासाहेब खोत, राजाभाऊ बागल, राम कुलकर्णी, कल्याण अप्पा पवार, सज्जनराव साळुंके, मधुकर मामा तावडे, धनाजी आनंदे, श्रीकृष्ण भन्साळी, संतोष देशपांडे, डॉ. मनोज घोगरे, डॉ. सत्यवान शिंदे, शरद सस्ते, शिवाजीराव गपाट, वसंतराव नागदे, कमलाताई नलावडे, सतिश कदम, गणेश बेळंबे, अनंतराव अडसूळ, काटीकर महाराज, रामदास वंजारी, धनंजय रणदिवे, चंद्रसेन देशमुख, रविंद्र केसकर, प्राचार्य सुलभा देशमुख, भास्कर दादा खोत आदी मान्यवर उपस्थित होते.