प्रतिनिधी / कळंब
MKCL मार्फत संपूर्ण महाराष्ट्रभर 15 ऑगस्टच्या निमित्ताने स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले असून, धाराशिव जिल्ह्यातही या प्रश्नमंजुषा स्पर्धेला विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. लाखावर विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे.
महाराष्ट्र ज्ञान मंडळ मर्यादित (एमकेसीएल) ही संस्था महाराष्ट्रातील ९ प्रमुख विद्यापीठे, शिक्षण संस्था व काही सामाजिक संस्था यांच्या सहयोगातून स्थापन झाली आहे. सामाजिक व आर्थिक परिवर्तनाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून, माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अध्ययन, अध्यापन व शैक्षणिक व्यवस्थापन क्षेत्रात ही संस्था गेली २१ वर्षे कार्यरत आहे. MKCL मार्फत यावर्षी १५ ऑगस्टचे (स्वातंत्र्यदिन) औचित्य साधून क्रांतिकारी, सत्याग्रह, स्वातंत्र्य लढ्यातील प्रेरणादायी महापुरुष यांच्या जीवनाच्या अभ्यासावर आधारित असलेल्या पेपर टेस्ट म्हणजेच स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.
शाळा आणि कॉलेजच्या सर्वच विद्यार्थ्यांनी या उपक्रमामध्ये सहभागी करून घ्यावे असा संकल्प MKCL मार्फत राज्य स्तरावर मांडण्यात आला. यासाठी धाराशिव जिल्ह्यातील MKCL च्या सर्व अधिकृत केंद्रांना एकाचवेळी सहभागी होण्याचे आवाहन MKCL चे जिल्हा समन्वयक धनंजय जेवळीकर यांनी केले होते. या आवाहनाला जिल्हाभरातील केंद्र चालकांनी प्रतिसाद देउन, संपूर्ण जिल्ह्यातील सर्वच शाळा आणि महाविद्यालये या ठिकाणी जाऊन, मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांना या उपक्रमाबद्दल माहिती दिली आणि उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी विनंती केली.जिल्हाभरातील जवळपास सर्वच शाळा आणि महाविद्यालये यात सहभागी झाले.
नवीन विक्रमाची नोंद
या पेपर टेस्टचा एक नवीनच विक्रम नोंदवला गेला. कारण जिल्हाभरातील 85000 येवढे शालेय विद्यार्थी, आणि 25000 येवढे महाविद्यालयीन विद्यार्थी या स्वातंत्र्य दिनानिमित्त घेतलेल्या परीक्षेमध्ये सहभागी झाले.धाराशिव जिल्ह्यामध्ये एखाद्या उपक्रमासाठी एवढ्या मोठ्या संख्येने सर्वच स्तरातून सहभागी झालेल्या विद्यार्थी, शाळा आणि महाविद्यालये यांची ही संख्या म्हणजे एक नवीन विक्रम ठरला आहे. याबद्दल mkcl चे जिल्हा समन्वयक धनंजय जेवळीकर यांनी जिल्हाभरातील सर्व केंद्र संचालकांचे आणि मुख्याध्यापक आणि प्राचार्य यांचे आभार मानले.