अमोलसिंह चंदेल / शिराढोण
पावसाने तब्बल 15 ते 20 दिवसांपासून ओढ दिली असून, त्यामुळे खरीप हंगामातील पिकांनी माना टाकल्या आहेत. काही ठिकाणी शेतकरी तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब करून पिकांना पाणी देण्याचा प्रयत्न करत असले तरी बहुतांश शेतकरी हातचा हंगाम वाया जाण्याच्या भीतीने व्याकुळ झाले आहेत. दरम्यान, मुरमाड क्षेत्रातील पिके अंतिम टप्प्यात आहेत तर आठ दिवसात पाऊस न झाल्यास काळ्या मातीतील पिकेही वाळून जाण्याचा धोका आहे.
कळंब तालुक्यातील शिराढोण परिसर ग्रीन बेल्ट म्हणून ओळखला जातो. सातत्याने उदभवणाऱ्या दुष्काळी परिस्थितीमुळे उसाला पर्याय म्हणून या भागातील शेतक-यांनी नगदी पीक म्हणून सोयाबीनची निवड केली. सोयाबीन क्षेत्रात वाढ होत असली तरी निसर्गाच्या अवकृपेने शेतकरी अडचणीत सापडत आहेत. चालू खरीप हंगामात शिराढोण महसूल मंडळात लागवडीखाली आलेल्या एकूण क्षेत्रापैकी तब्बल 8 हजार हेक्टरवर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली.गेल्या महिनाभरात महिन्यापासून परिसरात एकही मोठा पाऊस झाला नाही. त्यामुळे मोठया प्रमाणात पेरणी केलेल्या सोयाबीन पिकासह इतर पिके धोक्यात आली आहेत तर त्यावर वेगवेगळया किडींचा प्रादूर्भाव झाल्याने परिसरातील शेतकरी पुरता धास्तावला आहे.
शिराढोण महसूल मंडळात असलेल्या एकूण 17 गावातील 18 हजार 849 हेक्टर एवढ्या भौगोलीक क्षेत्रापैकी 15 हजार हेक्टरवर शेतक-यांनी विविध पिकांची पेरणी केली आहे. परंतू महसूल मंडळात जिल्हयाच्या इतर भागापेक्षा अतिशय निच्चांकी पावसाची नोंद झाली आहे. या परिसरात आतापर्यंत एकाही मोठ्या पावसाची नोंद न झाल्याने महसूल मंडळातील छोटे तलाव, बंदारे, नदी, नाले अजूनही कोरडेठाक आहेत. यामुळे परिसरातील शेतक-यांकडे उपलब्ध असलेल्या जलस्त्रोतांमधील जलपातळीत कसल्याही प्रकारची वाढ झाली नाही. शेतक-यांनी सुरुवातीला पडलेल्या जूजबी पावसाच्या भरवस्यावर आपल्या शेतात पेरणी केली. परंतू गेल्या महिन्यापासून परिसरात पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे शेतक-यांनी पेरणी केलेली पिके माना टाकत असून,दुसरीकडे पिकांवर वेगवेगळ्या किडींचा प्रादूर्भाव झाला आहे . उसनवारी करुन केलेली पेरणी व नंतर किडीच्या प्रदूभार्वापासून पिकांचा बचाव करण्यासाठी येणारा खर्च यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. शेतक-यांना अपेक्षित असलेले उत्पन्न यावर्षीही मिळणार नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. पावसाने मारलेल्या दडीमुळे शेतक-यांनी कष्टाने जोपासलेले उभे पिक धोक्यात आले असून यातून होणा-या नूकसानीचा अंदाज आल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
उष्ण व कोरडे हवामान सोयाबीनसाठी घातक
सोयाबीनची पेरणी केल्यानंतर पिक उगवणी ते काढणीदरम्याण हवामान उष्ण व कोरडे निर्माण झाल्यास या सोयाबीन पिकांवर मोठ्या प्रमाणात रोगांचा प्रादूर्भाव होवू शकतो. यात प्रामूख्याने तूडतूडे, खोडमाशी, लष्करी आळी, पाने पोखरणारी व गुंडाळणारी अळी, शेंगा पोखरणारी अळी, खोड राखी, करपा यासारख्या किडींच्या माध्यमातून पिकाचे नुकसान होते. यातील काही अळ्या जमीनीच्या आतूनही पिक नष्ट करण्याचा प्रयत्न करतात. परिसरातील सध्याचे वातावरण हे उष्ण व कोरडे असल्यानेच सोयाबीनवर मोठया प्रमाणात किडींचा प्रादूर्भाव झाल्याचे दिसून येते.
फवारणीच्या खर्चामुळे उत्पादन खर्चात वाढ
परिसरात पावसाने मारलेल्या दडीमूळे उष्ण व कोरडे हवामान तयार झाल्याने सोयाबीनवर प्रचंड प्रमाणात किडींचा प्रादूर्भाव झाला आहे. त्यापासून बचाव करण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात विविध किड प्रतिबंधक औषधांची फवारणी करत असल्याने तुलनेने यावर्षी सोयाबीनच्या उत्पादन खर्चात वाढ झाली आहे.मात्र योग्य प्रमाणात पाणी न मिळाल्याने खरीप हंगाम वाया जाणार, असे चित्र दिसत आहे.