प्रतिनिधी / धाराशिव
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल सभागृहात मराठा आरक्षणावर भूमिका मांडल्यानंतरही मराठा आंदोलक आंदोलनावर ठाम आहेत, या पार्श्वभूमीवर आंदोलनाची दाहकता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हाजिल्ह्यातील मराठा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना सरकारची बाजू समजावून सांगण्यासाठी तसेच कुणबी प्रमाणपत्राच्या नोंदीबद्दल अवगत करण्यासाठी बैठक घेण्यात येणार आहे.जिल्हा प्रशासनाने उद्या म्हणजेच गुरूवारी सकाळी 10 वाजता ही बैठक आयोजित केली असून, जिल्हाधिकारी स्वतः मराठा समन्वयकांशी संवाद साधणार आहेत.
ही बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात बोलाविण्यात आली आहे. यासंदर्भात राज्य शासनाच्या मुख्य सचिवांनी बुधवारी सर्व जिल्हाधिकारी यांना व्ही. सी. बैठकीमध्ये तसे निर्देश आहेत.
या व्ही. सी. बैठकीमध्ये मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर Imperical Data गोळा करण्यासंदर्भात निर्देश देण्यात आले असून यानुषंगाने गुरूवारी सकाळी 10.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्ह्यातील सर्व मराठा संघटनाच्या पदाधिकाऱ्यांशी जिल्हाधिकारी संवाद साधणार आहेत. सर्व मराठा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी या बैठकीला उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
24 तारखेनंतर आंदोलन
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 24 डिसेंबरपर्यंत मुदत दिली होती.मात्र सरकारच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात केलेल्या आवाहनानंतर देखील आंदोलक आंदोलनावर ठाम आहेत.बीड येथे 23 तारखेला इशारा सभा आयोजित करण्यात आली आहे. यात आंदोलनाचे पुढचे नियोजन स्पष्ट करण्यात येणार आहे.