प्रतिनिधी / येडशी
धाराशिव तालुक्यातील येडशी येथील ग्रामदैवत हजरत जमादार बाबा दर्गा यांची दरवर्षी भव्य स्वरूपात संदल मिरवणूक यावर्षी अत्यंत साध्या पद्धतीने काढण्यात आली.मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जालना जिल्ह्यात उपोषणाला बसलेल्या बांधवांना पाठिंबा म्हणून मुस्लिम बांधवांनी हा निर्णय घेतला.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शांततेत उपोषण करणाऱ्या समाज बांधवांवर पोलीस प्रशासनाच्या अमानुष लाठी हल्याच्या निषेधार्थ येडशी गाव बंद असल्याने येडशी येथील समस्त मुस्लीम बांधवानी या बंदमध्ये सहभाग घेवून बंदला पाठीबा दिला. तसेच मानकरी चांद पटेल यांच्या डोक्यावर संदल काढण्यात आली. ही संदल मिरवणूक बलवंड गल्ली, शहाजी राजे चौक, मस्जिद गल्लीमार्गे गावातील मुख्य रस्त्यावरून काढण्यात आली. रविवारी चिरागा व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी सकाळी जियारत संपन्न झाली. उरसानिमित्त गावातील भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. उरूस उत्साहात पार पाडण्यासाठी उर्स कमिटीचे सर्व पदाधिकारी व समस्त बांधवानी पुढाकार घेतला.