प्रतिनिधी / धाराशिव
शिवारात मुबलक प्रमाणात पाणी असूनही अपुऱ्या दाबाचा वीजपुरवठा आणि त्यात वारंवार येणारे अडथळे, यामुळे शेतकऱ्यांची प्रचंड गैरसोय होत होती. मात्र गावच्या सरपंच आणि समाजसेवींचा पाठपुरावा, पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी केलेले सहकार्य यामुळे वाशी तालुक्यातील मांडवा येथील शेतकऱ्यांची ही समस्या संपुष्ठात येणार आहे. कारण शेतकऱ्यांना नियमितपणे आणि उच्च दाबाने वीजपुरवठा व्हावा, यासाठी शिवारासाठी स्वतंत्र कृषी फिडर मंजूर झाले असून, या फिडरच्या उभारणीचे काम सोमवारी सुरू करण्यात आले.
मांडवा शिवारात पाण्याचा मुबलक साठा असूनही शेतकरी क्षेत्र बागायत.करू शकत नव्हते. मात्र गावच्या सरपंच डॉ.योगिनी संजय देशमुख यांच्यासह गावातील समाजसेवी नागरिकांनी दोन वर्षे केलेल्या पाठपुराव्यामुळे महावितरण कंपनीने गावानजीकच्या बावी उपकेंद्रातुन मांडवा शिवारासाठी स्वतंत्र कृषी(एजी ) फिडर निर्मितीला मंजुरी दिली. तसेच या कामाला सोमवारपासून आरंभ करण्यात आला.कृषी फीडर निर्मितीसाठी विजेचे खांब उभारण्याच्या कामाचा शुभारंभ वाशीचे शिवसेना नेते प्रशांत चेडे, सरपंच डॉ. योगिनी संजय देशमुख यांच्या हस्ते झाला. मांडवा गावातील शेतकऱ्यांच्या विजेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरपंचासह दिवंगत युवराज पाटील तसेच समाधान देशमुख व संतोष विष्णू देशमुख यांनी गावात आमरण उपोषण केले होते.त्यांनतर पालकमंत्री डॉ.तानाजीराव सावंत यांना भेटून निवेदन देण्यात आले होते, डॉ.सावंत यांनी हा प्रश्न तातडीने सोडवून शेतकऱ्यांना दिलासा दिला. त्यामुळे खांब उभारणीच्या कामादरम्यान सरपंच डॉ . देशमुख यांनी शेतकरी, गावकऱ्यांच्या वतीने पालकमंत्र्यांचे विशेष आभार मानले. तसेच वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या या प्रश्नासाठी प्रामाणिक प्रयत्न केल्याबद्दल त्यांचेही आभार मानले. गावकऱ्यांनी तसेच सरपंचानी उपस्थिताना पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. शेती व्यवसायात वीज पुरवठा ही मोठी समस्या असून त्यामुळे शेतीचे गणित कोलमडते.मात्र आता शिवारात नियमितपणे वीज पुरवठा झाल्यास शेतकऱ्यांची समस्या संपुष्टात येईल अशी भावना यावेळी काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली. खांब उभारणीच्या कामादरम्यान वाशी येथील नागनाथ नाईकवाडी, माजी उपसरपंच नितिन रणदिवे,श्यामराव शिंदे, भाऊसाहेब पाटील,धोंडीराम पाटील, बापू पाटील,जयराज परिहार,सुरेश परिहार,प्रभू शिंदे,कोंडीराम माळी, अशोक घुले,सुनील पाटील,डॉ मगर, ग्रामपंचायत सदस्य, तसेच मांडवा,सोनारवाडी आणि बावी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.