चारही मतदारसंघात विधानसभेच्या जागावाटपावरून युती आणि आघाडीत घमासान होणार
आरंभ मराठी / धाराशिव
विधानसभेच्या निवडणूकीचा बिगुल लवकरच वाजेल आणि सुरू होईल उमेदवारीसाठीची धडपड. कुणी म्हणेल मी मागच्या वेळी अत्यंत कमी मतांनी पराभूत झालो तर कुणी म्हणेल ही जागा आमच्याच पक्षाच्या वाट्याला हवी. इतिहासात कधी नव्हे एवढी रस्सीखेच या निवडणुकीत जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळेल. कारण, प्रथमच तीन – तीन प्रमुख राजकीय पक्षांची महाविकास आघाडी आणि महायुती झाली आहे. आता नाही तर आपण पुन्हा कधीच आमदार होऊ शकणार नाही,अशी भावना प्रत्येक इच्छुकांच्या मनात आहे.त्यामुळे सहाही पक्षात जोरदार स्पर्धा सुरू झाली आहे.
का होईल स्पर्धा ?
2019 नंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत.पक्ष फुटीच्या पार्श्वभुमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीच्या माध्यमातून काही पक्ष एकत्र आले आणि काही पक्ष दुभंगले. त्यातच अडीच वर्षांपासून जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर पालिकेच्या निवडणुका झालेल्या नसल्याने गाव पातळीवरील, शहरातील प्रमुख नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कोणतेही पद नाही. त्यामुळे या नेत्यांनी देखील आता थेट विधानसभेत जाण्याची मानसिकता सुरू केली आहे. आता एकत्र आलेल्या पक्षातील नेत्यांना उमेदवारीची अपेक्षा आहे. त्यामुळे श्रेष्ठींना आता खरी कसरत करावी लागणार आहे.
ठाकरेंची शिवसेना प्रमुख ठरेल दावेदार
जिल्ह्यातील विधानसभेच्या चार जागांवर महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांतील नेते दावे करू लागल्यामुळे विधानसभा निवडणुकीत जागावाटपावरून चांगलेच घमासान होणार आहे. सर्वच मतदारसंघांमध्ये कमी-अधिक प्रमाणात अशी परिस्थिती असल्यामुळे जागावाटपावरून आघाडी आणि युतीमधील घटक पक्षांमध्ये टक्कर होणार आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना (उबाठा) पक्षाच्या ओमराजे निंबाळकर यांनी सव्वा तीन लाखांपेक्षा अधिक मते घेऊन विजय मिळवला. एक खासदार आणि एक आमदार असलेली शिवसेना सध्या स्वतःला मोठा भाऊ समजत असल्यामुळे जिल्ह्यातील चारपैकी धाराशिव आणि उमरगा या दोन जागांवर सध्या दावा करत आहे.
धाराशिवमध्ये बंडखोरी होणार !
धाराशिवमधून विद्यमान आमदार कैलास पाटील यांनाच पुन्हा तिकीट दिले जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात असली तरी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या संजय पाटील दुधगावकर यांनाही उमेदवारी हवी आहे. त्यांनी ग्रामीण भागात जोरदार तयारी सुरू केली आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेत त्यांनी तशी इच्छा व्यक्त केली होती. या मतदारसंघात काँग्रेसचे अस्तित्व नसल्यामुळे शिवसेना (उबाठा), आणि राष्ट्रवादी (शरद पवार) या दोघांमध्ये या जागेवरून कुरबुरी होऊ शकतात. दुसरीकडे महायुतीमधून या जागेवर सुधीर पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरज साळुंके, नितीन काळे, दत्ताभाऊ कुलकर्णी, डॉ.सरोजिनी राऊत, अजित पिंगळे (भाजपा), अमित शिंदे (राष्ट्रवादी) हे नेते इच्छुक आहेत. महायुतीकडून तिन्ही पक्ष इच्छुक असल्यामुळे या जागेवर तोडगा काढणे कठीण जाणार आहे.
आमदार राणा पाटील जागा राखतील ?
तुळजापूर मतदारसंघ हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ आहे. मागच्या वेळी राणा पाटील यांनी भाजपकडून लढून या जागेवर विजय मिळवला होता. यावेळी राणा पाटील हेच उमेदवार असतील, अशी शक्यता आहे. विरोधात उमेदवार वाढले तर त्यांचा फायदा होईल. शिंदेंसेनेचे प्रवक्ते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय योगेश केदार यांनीही या जागेवर दावा करायला सुरुवात केली आहे. केदार यांनी गेल्या काही दिवसांपासून मतदारसंघात संपर्क वाढवला असून,त्यांनी मराठा आरक्षणासाठी तीर्थक्षेत्र तुळजापूर ते मुंबई अशी वनवास यात्रा काढली होती.शिवसेनेचे प्रवक्ते असूनही त्यांनी आपल्या जिल्ह्यात सामाजिक, विकासात्मक विषयावर परखड भूमिका घेतली आहे. तुळजापूरसाठी इच्छुक असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. महाविकास आघाडीत मात्र तुळजापूरच्या जागेवरून खडाजंगी होऊ शकते सध्या धीरज पाटील, मधुकरराव चव्हाण, विश्वास शिंदे (काँग्रेस), अशोक जगदाळे, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, जीवनराव गोरे (राष्ट्रवादी, शरद पवार), शामलताई वडणे (शिवसेना-उबाठा) हे नेते इच्छुक आहेत. काँग्रेसच्या धीरज पाटील यांनी तयारी केली असली तरी ज्येष्ठ नेते मधुकर चव्हाण यांचा अनुभव, मतदारसंघातील आवाका, मानणारा वर्ग, यामुळे त्यांचीच दावेदारी मजबूत असल्याचे बोलले जात आहे. मधूकर चव्हाण यांना उमेदवारी मिळाल्यास आमदार राणा पाटील यांच्यासाठीही निवडणूक सोपी नाही, असे म्हटले जात आहे. चव्हाण यांना मानणारा मोठा वर्ग असून, पक्षात त्यांच्याच नावाचा विचार होऊ शकतो. गेल्या काही वर्षापासून राजकीयदृष्ट्या फारसे सक्रिय नसणारे जिल्हा परिषदेचे आणि एस टी महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे यांनीही तुळजापूरच्या जागेवर तयारी सुरू केली आहे.
भूम -परंडा मतदारसंघात राष्ट्रवादीमध्ये स्पर्धा
भूम-परंडा-वाशी हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. राहुल मोटे सलग तीन वेळा निवडून आले होते. 2019 मध्ये डॉ.तानाजीराव सावंत यांनी मोटे यांचा पराभव केला होता. महायुतीकडून सावंत यांना कोणाचीच स्पर्धा नसल्यामुळे त्यांचा मार्ग सुकर दिसतोय. परंतू महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे राहुल मोटे, डॉ.प्रतापसिंह पाटील, शिवसेना (उबाठा) ज्ञानेश्वर पाटील यांनी उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. ज्ञानेश्वर पाटील हे दोन वेळा आमदार होते. मतदारसंघात शिवसेनेचे केडर त्यांनी मजबूत केलेले आहे त्यामुळे त्यांचे चिरंजीव रणजित पाटील यांच्यासाठी ते उमेदवारी मागू शकतात. शरद पवारांच्या राष्ट्रवादीत राहुल मोटे आणि डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्यात उमेदवारीसाठी पक्षांतर्गत चढाओढ सुरू आहे.
आमदार चौगुलेंकडून विकास कामांचा सपाटा
उमरगा मतदारसंघावर आमदार ज्ञानराज चौगुले यांची मजबूत पकड असली तरी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे दिग्विजय शिंदे आणि भाजपाचे रुद्रा स्वामी यांनी उमेदवारी मागितल्यामुळे महायुतीतील तीनही पक्ष दावेदार म्हणून समोर आले आहेत.वास्तविक पाहता आमदार चौगुले यांनी मतदारसंघात विकासाच्या कामांचा सपाटा लावला आहे,त्यामुळे अर्थातच ही जागा त्यांच्यासाठी सहज सोपी मानली जात आहे.त्यांनी जिल्ह्यात सर्वाधिक निधी खेचून आणून मतदारसंघात कामे केली आहेत. मतदारसंघातील विकास कामांचा अनेक वर्षांचा अनुशेष त्यांनी भरून काढला आहे. बच्चू कडू हे महायुतीत राहिले तर ते देखील त्यांचे निकटवर्तीय सातलींग स्वामी यांच्यासाठी उमेदवारी मागू शकतात. परंतु विद्यमान आमदार म्हणून चौगुले यांचा दावा मजबूत असेल. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून ठाकरेंच्या शिवसेनेचे विलास व्हटकर हे उमेदवारी मागत आहेत. तसेच अशोकराजे सरवदे, रमेश धनशेट्टी यांनीही लढवण्याची तयारी केली आहे.
नेत्यांची होणार कसरत
महाविकास आघाडी आणि महायुतीमधील घटक पक्षांनी प्रत्येक जागेवर दावे केल्यामुळे यातून मार्ग काढताना नेत्यांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे. यातून महाविकास आघाडी आणि महायुती दोन्हीमध्ये रुसवे फुगवे पहायला मिळणार आहेत.
–